-पुणे भारत गायन समाज व गोपाळ गायन समाजाला प्रत्येकी ५ लाखांचा निधी प्रदानज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे व रमा परांजपे यांच्यातर्फे देणगी प्रदान कार्यक्रम
पुणे : संगीत क्षेत्रात शतकोत्तर परंपरा लाभलेल्या पुणे भारत गायन समाज व गोपाळ गायन समाज या दोन प्रतिष्ठित संस्थांना प्रत्येकी रुपये पाच लाखांची देणगी ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब विष्णू परांजपे व त्यांच्या पत्नी रमा परांजपे यांनी दिली. सारसबागेतील पेशवे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात दोन्ही संस्थांच्या विश्वस्तांनी हा निधी स्वीकारला. यावेळी पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रामचंद्र परांजपे यांचे वडील स्व. बापूसाहेब उर्फ वि. रा. परांजपे व आई कमलाबाई परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकूण दहा लाख रुपयांची देणगी देण्यात आली. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे अध्यक्ष रमेश भागवत तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब विष्णू परांजपे हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. पुणे भारत गायन समाज संस्थेच्या शैला दातार, शिल्पा पुणतांबेकर, सावनी दातार तसेच गोपाळ गायन समाजातर्फे विकास कशाळकर, राधिका जोगळेकर यांनी धनादेश स्वीकारला.
रमेश भागवत म्हणाले, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात संस्था आहेत. उदार मनाचे लोक देणगी देतात म्हणून संस्था वाढत आहेत. आश्रयदात्यांशिवाय संस्था पुढे जाऊ शकत नाहीत. पुणे शहर हे संस्थात्मक शहर आहे. त्यामुळे संस्थांना मिळणाऱ्या निधीचा विनियोग चांगला केला तर ‘अर्थाला’ अर्थ आहे, असेही त्यांनी सांगितले. महेश सूर्यवंशी म्हणाले, पुण्यामध्ये सातत्याने कार्यरत असलेल्या आणि उत्तम काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान योग्य पद्धतीने व्हायला हवा. पुण्याची ओळख ही सांस्कृतिक राजधानी म्हणून आहे. परंतु त्यासाठी काहीही होत नाही. मुख्यमंत्री यांनी देखील याविषयी दखल घेतली आहे. आपण आपल्या पातळीवर अशा संस्थांच्या गरजा पूर्ण करीत संस्थांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करूया.
डॉ. रामचंद्र परांजपे म्हणाले, माझे वडील भारत गायन समाज येथे आणि आई गोपाळ गायन समाज येथे जात असे. सन १९५४-५५ च्या सुमारास बालगंधर्व यांचे आगमन आमच्या घरी झाले होते. ते पुण्यात मुक्कामास आमच्या घरी येत असत. अनेक गायक मंडळी देखील यानिमित्ताने घरी येत होते. त्यामुळे संगीत आणि गायनाच्या क्षेत्राशी आमची जवळीक होती. आज समाजात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत प्रकाराचा गवगवा नाही. बाकीचे प्रकार पुढे येत आहेत. अशा वेळी या दोन्ही संस्था नव्या पिढीला घडविण्याचे काम करीत असल्याने आम्ही देणगी दिल्याचे त्यांनी सांगितले. अधिश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राधिका परांजपे यांनी आभार मानले.
- फोटो ओळ : संगीत क्षेत्रात शतकोत्तर परंपरा लाभलेल्या पुणे भारत गायन समाज व गोपाळ गायन समाज या दोन प्रतिष्ठित संस्थांना प्रत्येकी रुपये पाच लाखांची देणगी ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब विष्णू परांजपे व त्यांच्या पत्नी रमा परांजपे दिली. सारसबागेतील पेशवे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात दोन्ही संस्थांच्या विश्वस्तांनी हा निधी स्वीकारला. यावेळी पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
