गायनाचा विश्वविक्रम करून ‘एक्सलन्स इंग्लंड’ पुरस्कार मिळवणाऱ्या 115 कलाकारांचा भव्य सत्कार संपन्न
स्वामिनी म्युझिक अकादमीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : तब्बल 115 गायकांना एकत्र आणून सलग 54 तासाच्या कालावधीत 575 गाणी सादर करण्याचा विश्वविक्रमी उपक्रम स्वामिनी म्युझिक अकादमीच्या वतीने आणि व्हॅलेंटिना वुमन एम्पॉवरमेंट यांच्या सहकार्याने बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे आयोजित करण्यात आला. या अनोख्या विश्वविक्रमाची दखल घेऊन या उपक्रमाला ‘एक्सलन्स इंग्लंड’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या विक्रमी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलावंतांचा आयोजकांच्या वतीने आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले मान्यवर मेघराज राजेभोसले (अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) आणि विख्यात अभिनेत्री दिग्दर्शक व निर्मात्या श्वेता शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच जेष्ठ अकॉर्डियन वादक अनिल गोडे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी यांनी विश्वविक्रमी उपक्रमाच्या व 115 गायक कलाकारांच्या सन्मान कार्यक्रमाच्या आयोजनात प्रमुख सहभाग घेतला. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, नगरसेविका रेश्मा बराटे, व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक आबासाहेब चोरघे,संतोष बांदल,संदीप पवार,अश्विनी पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विश्वविक्रम करणाऱ्या कलाकारांचे व या कलाकारांना मोठी संधी देणाऱ्या पुष्पा चौधरी यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच या कार्यक्रमात स्वतः अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी सोबतच सुप्रसिद्ध गायक मकरंद पाटणकर,गायक ऋषिकेश महाले, मोनाली दुबे,प्रिती पेठकर,गीतांजली जेधे, राजु काजे,संदीप पंचवाटकर, हृषीकेश महाले, रवींद्र शाळू,संजय मरळ, प्रतीक्षा चांदणे,अजय राव,पपीश लालगुणकर यांनी सुरेल गाण्यांची मैफिल रंगवली.
