व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले
मुंबई दि. 26 – व्यसन ही समाजातील मोठी समस्या आहे. व्यसनामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि तरुण पिढीवर त्याचे गंभीर परिणाम होतात. व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा आहे, असा संदेश देत नागरिकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन 2020 ते 2025 या पाच वर्षातील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.रामदास आठवले म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प आहे. देशाचे भविष्य तरुणाईच्या हातात आहे. ही तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडने ही गंभीर समस्या आहे. व्यसन ही सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी सरकार कडून कठोर पावले उचलली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून व्यसनमुक्त जीवन जगावे, असे आवाहन देखील ना.रामदास आठवले केले.
व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.
व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजातील अंधारात प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखी भूमिका बजावली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात, मात्र या क्षेत्रात कार्य करणारे लोक समाजासाठी आशेचा किरण आहेत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काय करावे आणि काय टाळावे हे स्वतः ठरवायचे असते, पण व्यसनाच्या मार्गावर गेलेल्या व्यक्तींना योग्य दिशेला आणणे हे अत्यंत कठीण आणि महत्त्वाचे काम आहे. पुरस्कार हा केवळ सन्मान नसून कार्यकर्त्यांच्या कष्टांची दखल आहे, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. व्यसनामुळे केवळ व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य आहे. एखादे कुटुंब वाचविणे हेच मोठे यश असून त्यातून मिळणारा आशीर्वाद हा खरा ठेवा आहे, असे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
पुरस्कारांतर्गत व्यक्तीगत पुरस्कारासाठी 15 हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, साडी, खण आणि श्रीफळ तसेच संस्था पुरस्कारासाठी 30 हजार रुपये सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ याप्रमाणे पुरस्काराचे वितरण करण्यात आले या 5 वर्षांच्या पुरस्कार निवडीमध्ये एकूण 100 व्यक्ती व 13 संस्थांचा समावेश आहे. या 100 व्यक्तींपैकी 88 पुरुष व 12 महिलांचा समावेश होता. कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आणि संस्थांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाषणाच्या सुरुवातीला ना. रामदास आठवले यांनी व्यसनमुक्तीवर काही कविता सादर केल्या…..
जर केली तुम्ही रोज नशा;
तर समाजात होईल तुमचा हशा ;
तुम्ही आहात आमची फार मोठी आशा,
आणि मराठी आहे आमची भाषा !
मग का करता तुम्ही नशा?
मी करतो नशा…
पण ती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नशा !!
म्हणुन आहे माझ्या जीवनात फार मोठी आशा !!!
होईल जर व्यसनमुक्ती;
तर वाढेल महाराष्ट्राची शक्ती !
भेंदुबाबाची करु नका भक्ती,
असं केल तर कधी होणार नाही तुमची मुक्ती !
ना.रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीत या कविता सादर करताच सभागृहात प्रचंड टाळया आणि हशांनी प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख
