March 23, 2026

पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवात दिग्गज कलाकारांचे सादरीकरण ठरले पर्वणी

0
IMG-20260321-WA0062
Spread the love

महोत्सवाच्या तिसऱ्या सत्राचा पद्मविभूषण डॉ. एन. राजम यांच्या व्हायोलिन वादनाने समारोप

पुणे, दि. 21 (प्रतिनिधी) – शास्त्रीय गायन आणि व्हायोलिन वादनाच्या सुरांनी नटलेल्या दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणामुळे पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस अक्षरशः रंगून गेला. देश-विदेशात हिंदुस्तानी संगीताचा ठसा उमटवणारे पंडित राम शंकर, ज्येष्ठ गायक डॉ. राजा काळे आणि पद्मविभूषण डॉ. एन. राजम यांच्या बहारदार सादरीकरणाने रसिकांना संगीताची पर्वणी लाभली.

तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ संस्थेतर्फे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित 20 व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.

पंडित राम शंकर यांनी राग शुद्ध कल्याणने आपल्या मैफिलीची सुरुवात केली. विविध रागांनी सजलेले त्यांचे सादरीकरण रसिकांना भावले. सुयोग कुंडलकर (संवादिनी), चारुदत्त फडके (तबला), पल्लवी पिळणकर आणि मिलन धाक्रस (तानपुरा) यांनी त्यांना समर्थ साथसंगत दिली. “पंडित जितेंद्र अभिषेकी यांसारख्या महान कलाकाराच्या महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे,” असे पंडित राम शंकर यांनी सांगितले. यावेळी शाम टेकाळे, स्वाती टेकाळे आणि दादा तरंगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. राजा काळे यांच्या मैफिलीने रंगत अधिकच वाढवली. राग झिंजोटीतील बंदिशींनी त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित सुधीर नायक (हार्मोनियम) आणि प्रशांत पांडव (तबला) यांनी त्यांना साथ दिली. मध्य प्रदेश सरकारचा ‘तानसेन पुरस्कार’ मिळाल्याबद्दल राजीव पाटील आणि कल्याणी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

पद्मविभूषण डॉ. एन. राजम यांच्या व्हायोलिन वादनाची रसिक आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्या रंगमंचावर आगमन होताच टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. राग देशने त्यांनी आपल्या वादनाची सुरुवात केली. अप्रतिम सादरीकरणातून त्यांनी रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती दिली. रागिनी शंकर (व्हायोलिन) आणि पंडित अरविंद कुमार आझाद (तबला) यांनी त्यांना साथसंगत केली.

यंदा जाहीर झालेल्या पद्मविभूषण पुरस्काराबद्दल पंडित शौनक अभिषेकी आणि उज्वल केसकर यांच्या हस्ते डॉ. एन. राजम यांचा सत्कार करण्यात आला. “पुणे शहराशी माझे अनेक वर्षांचे घट्ट नाते आहे. येथे सादरीकरण करताना वेगळाच आनंद मिळतो. या महोत्सवात पुन्हा सहभागी होण्याचा विशेष आनंद आहे,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्याताई अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘विद्याताई अभिषेकी स्मृती पुरस्कार’ यंदा सवाई गंधर्व यांच्या नातसून शीला देशपांडे यांना डॉ. एन. राजम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी