-मंडईजवळील स्वामी समर्थ मठातर्फे स्वामी प्रकट दिनानिमित्त जन्मसोहळा व पाळणा
श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान ; कीर्तन, लघुरुद्र, भजनासह विविध कार्यक्रम
पुणे : श्री स्वामी समर्थ… स्वामी समर्थ महाराज की जय… चा जयघोष आणि फुलांनी सजविलेल्या पाळण्यामध्ये सकाळी सुर्योदयानंतर झालेल्या श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी झालेल्या जन्मसोहळ्यात पुणेकरांनी भक्तीभावाने सहभाग घेतला. मंदिरामध्ये स्वामींच्या मूर्तीला पोशाख, दागिने आणि गाभा-यात फुलांची आकर्षक आरास व विद्युतरोषणाई करण्यात आली.
महात्मा फुले मंडईजवळील रामेश्वर चौकातील श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, बुधवार पेठच्या श्री स्वामी समर्थ मठात स्वामी प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष गजानन जेधे, कोषाध्यक्ष संदीप होनराव, विश्वस्त रविंद्र शेडगे, विक्रम आगाशे, श्रीराम पुरंदरे, डॉ.अमित वाडदेकर यांसह कार्यकर्ते व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. भाविकांना प्रसाद म्हणून ५० हजार बेसन लाडू वाटप करण्यात आले.
स्वामी प्रकटदिनानिमित्त शुक्रवारी पहाटे ३ वाजता श्रीं चा लघुरुद्र अभिषेकाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ कीर्तनकार वासुदेवबुवा बुरसे यांचे प्रकटदिनाचे कीर्तन झाले. सायंकाळी फुलांनी सजविलेल्या पालखीतून श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पादुकांची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली.
कमलेश कामठे म्हणाले, श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, रामेश्वर चौक, शनिपार, निंबाळकर तालीम, खुन्या मुरलीधर मंदिर, चित्रशाळा चौक, मोदी गणपती, ओंकारेश्वर, शनिवारवाडा, देसाई महाविद्यालय, छत्रपती शिवाजी रस्ता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर, दत्तमंदिर मार्गे श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान येथे मिरवणुकीचा समारोप झाला. यामध्ये आदिमायेची मूर्ती, प्रभात बँड, नादब्रह्म ट्रस्ट ढोल ताशा पथक यांसह भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.
*फोटो ओळ – महात्मा फुले मंडईजवळील रामेश्वर चौकातील श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, बुधवार पेठच्या श्री स्वामी समर्थ मठात स्वामी प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी झालेल्या जन्मसोहळ्यात पुणेकरांनी भक्तीभावाने सहभाग घेतला.
