तारपा वादनाच्या सुमधूर निनादात ‘दगडूशेठ’ संगीत महोत्सवाचा प्रारंभश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ४२ वा वर्धापनपदिन ; महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा जपणारे तारपा वादन… तारपाच्या गजरात आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या नृत्याने पुणेकरांची मने जिंकली. पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा आणि तारपा पथकाच्या तारपा वादन व नृत्याच्या कार्यक्रमात एकात्मता, परंपरा आणि आनंदाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे गणपती मंदिराच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून आयोजित संगीत महोत्सवाचा प्रारंभ झाला. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित महोत्सवाचे उद्घाटन महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. शिवराज कदम जहागिरदार, ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके आदी उपस्थित होते. ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके व सहका-यांचा फिटे अंधाराचे जाळे हा कार्यक्रम झाला.
भिकल्या लाडक्या धिंडा म्हणाले, माडाचा बांबू आणि दुधी भोपळ्यापासून तारपा हे वाद्य बनवले जाते. हे वाद्य माझ्या संस्कृतीची शान आहे आणि माझी संस्कृती जतन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. माझी खरी श्रीमंती म्हणजे माझे प्रेक्षक आहेत, चाहते आहे. जे मला बोलावतात आणि माझ्या संस्कृतीचा अनुभव घेतात त्याचा आदर करतात. माणसाने कला जोपासली पाहिजे आणि ती पुढे नेली पाहिजे.
सुनील रासने म्हणाले, शुक्रवार, दि.२० मार्च रोजी पं.उपेंद्र भट आणि सहका-यांचा गुरु गणेश हा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नंदेश उमप आणि ७५ कलाकारांचे सादरीकरण असलेला मी मराठी हा कार्यक्रम अनुभवण्याची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. शनिवार, दि. २१ मार्च रोजी खंडेराव मुळे आणि सहका-यांचा स्वरायात्रा हा कार्यक्रम सादर होईल. तर, दुस-या सत्रात कुणाला गांजावाला लाईव्ह इन कॉन्सर्ट चा आनंद पुणेकरांना घेता येईल.
रविवार, दि. २२ मार्च रोजी नटरंग अॅकॅडमी तर्फे त्रिपुंड हा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर माणिक वर्मा फाऊंडेशन निर्मित अमृताहुनी गोड या कार्यक्रमात राणी वर्मा, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, शैला दातार, सावनी दातार, निलाक्षी पेंढारकर, दीपिका जोग, ह्रदया दातार यांच्या सादरीकरण पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे.
महोत्सवाची सांगता सोमवार, दि. २३ मार्च रोजी पहिल्या सत्रात स्वरप्रज्ञा पं. मिलिंद रायकर, यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन जुगलबंदीने आणि दुस-या सत्रात पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांचा भावसरगम या स्वरमैफलीने होणार आहे. रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि. मराठी शाळा येथे करण्यात आली आहे. संगीत महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
- फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे गणपती मंदिराच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून आयोजित संगीत महोत्सवाचा प्रारंभ झाला. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित महोत्सवाचे उद्घाटन महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा आणि तारपा पथकाचा तारपा वादन व नृत्याचा कार्यक्रम झाला.
