March 19, 2026

-श्री स्वामी समर्थांच्या सूर्यमणी आणि पादुकांचे पुण्यात आगमनश्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर ; इतिहासात प्रथमच राजवाड्याबाहेर पुण्यात सूर्यमणी व पादुकांचे दर्शन

0
IMG-20260317-WA0046
Spread the love

पुणे : श्री स्वामी समर्थ… श्री स्वामी समर्थ… श्री स्वामी समर्थ महाराज की जय… च्या नामघोषात श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांचे पूजन करीत विविध प्रमुख देवस्थानांतर्फे उत्साहात स्वागत देखील करण्यात आले. सूर्यमणी आणि पादुका या दोन्हींचे दर्शन इतिहासात प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर पुणेकरांना मिळत आहे.

श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला श्री स्वामी समर्थ सूर्यमणी व पादुका दर्शन सोहळा दि. १७ व १८ मार्च २०२६ रोजी सायं. ५ ते रात्री १० आणि दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत एरंडवणे डीपी रस्त्यावरील सिद्धी साज बँक्वेट, पुणे येथे संपन्न होत आहे. यावेळी पुणेकारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.

या दर्शन सोहळ्याची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सूर्यमणी व पादुका बाप्पाच्या दर्शनासाठी आणून झाली. तेथून पुढे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ मठ तसेच श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग येथे भेट देत हा पवित्र सोहळा कार्यक्रमस्थळी पोहोचला. यावेळी सर्व देवस्थानांचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) म्हणाले, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाशी आणि त्यांच्या अद्भुत लीलांशी संबंधित अनेक पवित्र वस्तू आजही भक्तांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामध्ये सर्वांत विशेष व दिव्य मानली जाणारी वस्तू म्हणजे सूर्यमणी. हाच श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांचे दर्शन सर्वसामान्य भक्तांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे या दोन्हींचे दर्शन इतिहासात प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर पुण्यामध्ये भक्तांना घेता येत आहे.

भक्तांना परिचित असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या अनेक चित्रांमध्ये आणि प्रतिमांमध्ये स्वामी महाराज आपल्या दोन बोटांमध्ये एक तेजस्वी मणी धारण करून बसलेले दिसतात. हाच तो पवित्र सूर्यमणी होय. हा सूर्यमणी स्वामींच्या दिव्य शक्तीचे, आध्यात्मिक तेजाचे आणि त्यांच्या कृपाशक्तीचे प्रतीक मानला जातो. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या आयुष्यभर भक्तांच्या कल्याणासाठी, त्यांच्या दुःखांचा नाश करण्यासाठी आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी अनेक चमत्कारिक लीलांचा अविष्कार केला. त्या दिव्य लीलांचे स्मरण करून देणारा हा सूर्यमणी म्हणजे स्वामींच्या कृपेचा जिवंत साक्षीदार मानला जातो.

परंपरेनुसार हा सूर्यमणी स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटच्या राजघराण्यास प्रदान केला होता. तेव्हापासून हा दिव्य ठेवा अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि जतनाने अक्कलकोट राजघराण्याकडे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार या सूर्यमणीमध्ये स्वामींच्या उपस्थितीचे आणि कृपाशक्तीचे अद्वितीय स्पंदन आजही अनुभवता येते.

पुण्यात आयोजित करण्यात आलेला हा पवित्र दर्शन सोहळा श्री स्वामी समर्थ प्रकट दिन (२० मार्च) या अत्यंत पावन दिवसाच्या अगोदर आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या माध्यमातून हजारो भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा लाभ घेण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

या दर्शन सोहळ्याच्या दरम्यान आरती, अभिषेक, होम–हवन तसेच विविध धार्मिक विधीही संपन्न होणार आहेत. त्यामुळे भाविकांना केवळ दर्शनच नव्हे तर एक संपूर्ण आध्यात्मिक वातावरण अनुभवण्याची संधी मिळत आहे. सदर दर्शन सोहळ्यासाठी सुरेखा उत्तमराव बहिरट पाटील यांनी स्थळ प्रायोजकत्व स्वीकारले आहे. तरी पुणेकरांनी आणि स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इतिहासात प्रथमच पुण्यात होत असलेल्या या पवित्र सूर्यमणी व पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

  • फोटो ओळ : श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांचे पुण्यात आगमन झाले. याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सूर्यमणी आणि पादुका या दोन्हींचे दर्शन इतिहासात प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर पुणेकरांना मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी