March 19, 2026

श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि पादुकांच्या दर्शनाला पुणेकरांची अलोट गर्दीएरंडवणे डीपी रस्त्यावरील सिद्धी साज बँक्वेट येथे आयोजन ; इतिहासात प्रथमच राजवाड्याबाहेर पुण्यात सूर्यमणी व पादुकांचे दर्शन

0
IMG-20260318-WA0041
Spread the love


पुणे : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील सर्वांत विशेष व दिव्य मानली जाणारी वस्तू म्हणजे सूर्यमणी. हाच श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेण्याची संधी पुणेकरांना मिळाली असून त्याकरिता भक्तांची अलोट गर्दी होत आहे. दोन्हींचे दर्शन इतिहासात प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर पुण्यामध्ये भक्तांना घेता येत आहेत.

अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांनी श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर यांच्या माध्यमातून हा सूर्यमणी व पादुका दर्शन सोहळा आयोजित केला आहे. एरंडवणे डीपी रस्त्यावरील सिद्धी साज बँक्वेट, पुणे येथे दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) म्हणाले, भक्तांना परिचित असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या अनेक चित्रांमध्ये आणि प्रतिमांमध्ये स्वामी महाराज आपल्या दोन बोटांमध्ये एक तेजस्वी मणी धारण करून बसलेले दिसतात. हाच तो पवित्र सूर्यमणी होय. हा सूर्यमणी स्वामींच्या दिव्य शक्तीचे, आध्यात्मिक तेजाचे आणि त्यांच्या कृपाशक्तीचे प्रतीक मानला जातो.

परंपरेनुसार हा सूर्यमणी स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटच्या राजघराण्यास प्रदान केला होता. तेव्हापासून हा दिव्य ठेवा अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि जतनाने अक्कलकोट राजघराण्याकडे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार या सूर्यमणीमध्ये स्वामींच्या उपस्थितीचे आणि कृपाशक्तीचे अद्वितीय स्पंदन आजही अनुभवता येते.

पुण्यात आयोजित करण्यात आलेला हा पवित्र दर्शन सोहळा श्री स्वामी समर्थ प्रकट दिन (२० मार्च) या अत्यंत पावन दिवसाच्या अगोदर आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या माध्यमातून हजारो भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा लाभ घेण्याची संधी मिळत असल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

या दर्शन सोहळ्याच्या दरम्यान आरती, अभिषेक, होम–हवन तसेच विविध धार्मिक विधीही संपन्न होत आहेत. सदर दर्शन सोहळ्यासाठी सुरेखा उत्तमराव बहिरट पाटील यांनी स्थळ प्रायोजकत्व स्वीकारले आहे. तरी पुणेकरांनी आणि स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इतिहासात प्रथमच पुण्यात होत असलेल्या या पवित्र सूर्यमणी व पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

  • फोटो ओळ : श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेण्याची संधी पुणेकरांना मिळाली असून त्याकरिता भक्तांची अलोट गर्दी होत आहे. अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांनी श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर यांच्या माध्यमातून हा सूर्यमणी व पादुका दर्शन सोहळा आयोजित केला आहे. एरंडवणे डीपी रस्त्यावरील सिद्धी साज बँक्वेट, पुणे येथे दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी