कराटे सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे वाचला जीव: पुण्यातील १० वर्षांच्या मुलीच्या स्वादुपिंडातील दुर्मिळ गाठ यशस्वीरित्या काढली
पुण्यात मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे स्वादुपिंडातील दुर्मिळ SPN गाठीवर भारतातील सर्वात कमी वयातील रुग्णांपैकी एका मुलीवर यशस्वी उपचार; उपचारानंतर मुलगी पुन्हा शाळेत.
पुणे, १३ मार्च २०२६: पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील कॅन्सर सर्जनांनी १० वर्षांच्या मुलीच्या स्वादुपिंडातील दुर्मिळ गाठ यशस्वीरित्या काढून टाकली. या केससह भारतात स्वादुपिंडाच्या सॉलिड स्यूडोपापिलरी निओप्लाझम (एसपीएन) या आजाराने पीडत सर्वात कमी वयाच्या रूग्णाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, या गाठीची शरीरात कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. पण, शाळेत कराटेच्या तासादरम्यान पोटाला झालेल्या दुखापतीमुळे या आजाराचे अनपेक्षितपणे निदान झाले.
इमेजिंग आणि बायोप्सीसह तपासण्या केल्यानंतर सॉलिड स्यूडोपापिलरी निओप्लाझम (एसपीएन)चे निदान झाले. हा स्वादुपिंडाचा दुर्मिळ आणि कमी तीव्रतेचा कर्करोगजन्य ट्यूमर आहे, जो पूर्णपणे काढून टाकल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अत्यंत जास्त असते. एकूण स्वादुपिंडाच्या गाठींपैकी एसपीएनचे प्रमाण फक्त १ ते ३ टक्के असते आणि दरवर्षी १० लाख व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार होतो. हा आजार प्रामुख्याने तरुण महिलांमध्ये, साधारणपणे किशोरवयीन ते ३० वर्षांच्या वयोगटात अधिक आढळतो, आणि लहान मुलांमध्ये या आजाराचे निदान होणे अत्यंत दुर्मिळ आहे. त्या मुलीमध्ये आजाराची कोणतीच लक्षणे दिसून येत नव्हती, तसेच ती नेहमीप्रमाणे शाळेत जात होती आणि दैनंदिन काम करत होती, ज्यामुळे या निदानामुळे तिच्या पालकांना मोठा धक्का बसला. शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबाने अनेक हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतला.
या केसबाबत सांगताना बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजीचे एचओडी व कन्सल्टण्ट डॉ. अमित पारसनीस म्हणाले , ” शस्त्रक्रियेदरम्यान स्वादुपिंडाच्या रचनेचे नीट निरीक्षण केल्यानंतर आम्ही सेंट्रल पॅनक्रिएटॉमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आम्हाला ड्युओडेनम (लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग) आणि स्वादुपिंडाचा काही भाग सुरक्षित राखता आला, तसेच व्हिपल प्रोसिजर सारखी मोठी व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया टाळता आली. स्वादुपिंड हा अवयव शरीरातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांच्या अगदी जवळ असतो आणि लहान मुलांना रक्ताचा जास्तीचा स्त्राव सहन होत नाही, त्यामुळे ही शस्त्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होती. पण, आम्ही अत्यंत कमी रक्तस्त्रावात ही गाठ सुरक्षितपणे काढून टाकली आणि स्वादुपिंडाचे कार्य कायम ठेवले. रुग्ण मुलगी आता पूर्णपणे बरी झाली आहे, तसेच ती पुन्हा शाळेत जाऊ लागली आहे आणि पुन्हा दैनंदिन काम करू लागली आहे. ती आता सामान्य आयुष्य जगू शकेल, अशी आम्हाला खात्री आहे .”
स्वादुपिंडाच्या गाठी अनेकदा बराच काळ कोणतीही लक्षणे न दिसता शरीरात राहू शकतात आणि कधी-कधी इतर कारणांसाठी केलेल्या तपासणीमध्ये त्यांचे अनपेक्षितपणे निदान होते. अशा दुर्मिळ आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी, विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत वेळेवर केलेली तपासणी आणि बहुआयामी टीमने केलेले उपचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलचे क्लस्टर डायरेक्टर श्री. आनंद मोटे म्हणाले, प्रगत कॅन्सर थेरपी, गॅस्ट्रोएण्टेरोलॉजी व पीडियाट्रिक सर्जरी करणाऱ्या आमच्या व्यावसायिकांची बहुआयामी टीम, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान व आपलेपणाने आम्ही या सेवा देतो. मणिपाल हॉस्पिटल्समध्ये आम्ही विशेषत: आव्हानात्मक व दुर्मिळ केसेसमध्ये सुरक्षित, गुणकारी व रूग्ण-केंद्रित केअर देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ”
सर्जिकल ऑन्कोलॉजीचे डॉ. अमित पारसनीस, तसेच अॅनेस्थेसियोलॉजिस्ट डॉ. आशिष पाठक, पीडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट डॉ. पूजा गिरे आणि बहुआयामी टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली.
