श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि पादुकांचे पुणेकरांना घेता येणार दर्शनइतिहासात प्रथमच राजवाड्याबाहेर पुण्यात सूर्यमणी व पादुकांचे दर्शन
पुणे : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाशी आणि त्यांच्या अद्भुत लीलांशी संबंधित अनेक पवित्र वस्तू आजही भक्तांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामध्ये सर्वांत विशेष व दिव्य मानली जाणारी वस्तू म्हणजे सूर्यमणी. हाच श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांचे दर्शन सर्वसामान्य भक्तांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे या दोन्हींचे दर्शन इतिहासात प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर पुण्यामध्ये भक्तांना घेता येईल, अशी माहिती अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला डॉ. महेश नामपूरकर उपस्थित होते.
श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला श्री स्वामी समर्थ सूर्यमणी व पादुका दर्शन सोहळा दि. १७ व १८ मार्च २०२६ रोजी सायं. ५ ते रात्री १० आणि दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत एरंडवणे डीपी रस्त्यावरील सिद्धी साज बँक्वेट, पुणे येथे संपन्न होणार आहे.
या दर्शन सोहळ्याची सुरुवात दि. १७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सूर्यमणी व पादुका बाप्पाच्या दर्शनासाठी आणून होणार आहे. तेथून पुढे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ मठ तसेच श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग येथे भेट देत हा पवित्र सोहळा कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे.
याबाबत माहिती देताना श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) म्हणाले की, भक्तांना परिचित असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या अनेक चित्रांमध्ये आणि प्रतिमांमध्ये स्वामी महाराज आपल्या दोन बोटांमध्ये एक तेजस्वी मणी धारण करून बसलेले दिसतात. हाच तो पवित्र सूर्यमणी होय. हा सूर्यमणी स्वामींच्या दिव्य शक्तीचे, आध्यात्मिक तेजाचे आणि त्यांच्या कृपाशक्तीचे प्रतीक मानला जातो.
श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या आयुष्यभर भक्तांच्या कल्याणासाठी, त्यांच्या दुःखांचा नाश करण्यासाठी आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी अनेक चमत्कारिक लीलांचा अविष्कार केला. त्या दिव्य लीलांचे स्मरण करून देणारा हा सूर्यमणी म्हणजे स्वामींच्या कृपेचा जिवंत साक्षीदार मानला जातो.
परंपरेनुसार हा सूर्यमणी स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटच्या राजघराण्यास प्रदान केला होता. तेव्हापासून हा दिव्य ठेवा अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि जतनाने अक्कलकोट राजघराण्याकडे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार या सूर्यमणीमध्ये स्वामींच्या उपस्थितीचे आणि कृपाशक्तीचे अद्वितीय स्पंदन आजही अनुभवता येते.
श्रीमंत मालोजीराजे पुढे म्हणाले की, “भक्तांच्या श्रद्धेनुसार या सूर्यमणीमध्ये सूर्यासारखे तेज, आध्यात्मिक शक्ती आणि स्वामींच्या कृपाशक्तीचे अद्भुत प्रतिबिंब आहे. त्यामुळे त्याचे दर्शन घेताना अनेक भक्तांना मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि अपार भक्तिभाव अनुभवायला मिळतो.”
पुण्यात आयोजित करण्यात आलेला हा पवित्र दर्शन सोहळा श्री स्वामी समर्थ प्रकट दिन (२० मार्च) या अत्यंत पावन दिवसाच्या अगोदर आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या माध्यमातून हजारो भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा लाभ घेण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावर्षी हा सोहळा हिंदू नववर्षाच्या पावन पर्वाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला असल्याने त्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या शुभ प्रसंगी भक्तांना केवळ सूर्यमणी व पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार नाही, तर स्वामी समर्थांच्या कृपेशी जोडणाऱ्या एका मोठ्या आध्यात्मिक उपक्रमाचा भाग होण्याचीही संधी मिळणार आहे.
याच अनुषंगाने अनुभूती (Anubhuti) या आध्यात्मिक प्रकल्पाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांच्या भक्तांना एका विशेष उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये भक्तांना स्टुडिओ अपार्टमेंटच्या आंशिक (Partial) मालकीद्वारे सहभाग घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या उपक्रमाविषयी माहिती देताना श्रीमंत मालोजीराजे म्हणाले की, “या पवित्र प्रसंगी आम्ही सर्व स्वामीभक्तांना ‘अनुभूती’ या आध्यात्मिक विकास प्रकल्पाचा भाग होण्याची संधी देत आहोत. या प्रकल्पामध्ये सहभागी होऊन भक्तांना केवळ एका आध्यात्मिक ठिकाणाशी जोडले जाण्याचा लाभ मिळणार नाही, तर ते स्वामी समर्थांच्या सेवेत आणि अक्कलकोटच्या विकासात थेट योगदान देऊ शकतील.”
या उपक्रमामधून मिळणारी देणगी अक्कलकोट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, धार्मिक आणि आध्यात्मिक सुविधांच्या उभारणीसाठी तसेच भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमात सहभागी होणाऱ्या भक्तांना टाइम शेअर पद्धतीने स्टुडिओ अपार्टमेंटचा लाभ मिळणार असून भविष्यात त्यांच्या कुटुंबियांनाही त्याचा उपयोग होऊ शकणार आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ आध्यात्मिक सहभाग नसून भाविकांसाठी दीर्घकालीन लाभदायी ठरणार आहे.
श्रीमंत मालोजीराजे म्हणाले, “या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली देणगी सर्वसामान्य भक्तांच्या आवाक्यात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक स्वामीभक्तांनी या पवित्र उपक्रमात सहभागी व्हावे. या सहभागामुळे भाविकांना आध्यात्मिक समाधान लाभेल आणि त्यांच्या कुटुंबियांनाही भविष्यात त्याचा लाभ मिळेल.”
स्वामी समर्थांच्या कृपेचा हा दिव्य ठेवा म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा संगम असून सूर्यमणी व स्वामींनी वापरलेल्या पादुकांचे दर्शन हे भक्तांसाठी केवळ एक दर्शन नसून स्वामी समर्थांच्या दिव्य ऊर्जेशी जोडणारा एक आध्यात्मिक अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.
या दर्शन सोहळ्याच्या दरम्यान आरती, अभिषेक, होम–हवन तसेच विविध धार्मिक विधीही संपन्न होणार आहेत. त्यामुळे भाविकांना केवळ दर्शनच नव्हे तर एक संपूर्ण आध्यात्मिक वातावरण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. सदर दर्शन सोहळ्यासाठी सुरेखा उत्तमराव बहिरट पाटील यांनी स्थळ प्रायोजकत्व स्वीकारले आहे. तरी पुणेकरांनी आणि स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इतिहासात प्रथमच पुण्यात होत असलेल्या या पवित्र सूर्यमणी व पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
