गुढीपाडव्यापासून विविध कार्यक्रमांनी सजणार ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सवश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ४२ वा वर्धापनपदिन ; दिग्गजांसह युवा कलाकारांचे सादरीकरण अनुभवण्याची संधी
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे गणपती मंदिराच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजेच दि. १९ ते २३ मार्च पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा संगीत महोत्सव दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संगीत महोत्सवात दिग्गज कलाकारांसह युवा कलाकारांचे सादरीकरण अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रासने यांनी दिली.
गुढीपाडव्याला म्हणजेच १९ मार्च रोजी सायंकाळी ४.४५ वाजता गणेशपूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. तसेच सायंकाळी ६.४५ वाजता महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन होईल. संगीत महोत्सव दोन सत्रांमध्ये होणार आहे. गुरुवारी (दि.१९) पहिल्या सत्रात सायंकाळी ५ वाजता पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा आणि तारपा पथकाचा तारपा वादन व नृत्याचा कार्यक्रम होईल. तर, दुस-या सत्रात सायंकाळी ७ वाजता ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके व सहका-यांचा फिटे अंधाराचे जाळे हा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार, दि.२० मार्च रोजी पं.उपेंद्र भट आणि सहका-यांचा गुरु गणेश हा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नंदेश उमप आणि ७५ कलाकारांचे सादरीकरण असलेला मी मराठी हा कार्यक्रम अनुभवण्याची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.
शनिवार, दि. २१ मार्च रोजी खंडेराव मुळे आणि सहका-यांचा स्वरायात्रा हा कार्यक्रम सादर होईल. तर, दुस-या सत्रात कुणाला गांजावाला लाईव्ह इन कॉन्सर्ट चा आनंद पुणेकरांना घेता येईल. रविवार, दि. २२ मार्च रोजी नटरंग अॅकॅडमी तर्फे त्रिपुंड हा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर माणिक वर्मा फाऊंडेशन निर्मित अमृताहुनी गोड या कार्यक्रमात राणी वर्मा, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, शैला दातार, सावनी दातार, निलाक्षी पेंढारकर, दीपिका जोग, ह्रदया दातार यांच्या सादरीकरण पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे.
महोत्सवाची सांगता सोमवार, दि. २३ मार्च रोजी पहिल्या सत्रात स्वरप्रज्ञा पं. मिलिंद रायकर, यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन जुगलबंदीने आणि दुस-या सत्रात पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांचा भावसरगम या स्वरमैफलीने होणार आहे. रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि. मराठी शाळा येथे करण्यात आली आहे. संगीत महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
