दिवंगत विद्यार्थीनी अनुष्का पाटोळेला न्याय मिळवुन देण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांची ना. रामदास आठवले भेट घेणार
लातुरमधील अनुष्का पाटोळे दलित विद्यार्थीनीच्या संशयास्पद मृत्युची सीआयडी चौकशी करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
दिवंगत विद्यार्थीनी अनुष्का पाटोळेच्या कुटुंबियाची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट
औसा/ मुंबई दि. 26 – लातुर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वीत शिकणा-या अनुष्का पाटोळे या दलित मातंग समाजाच्या कोवळया मुलीचा विद्यालयातच संशयास्पद मृत्यु झालेला आहे. मृत्यु आत्महत्या नसुन हत्या असल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केलेला आहे. या आरोपांची दखल घेवुन मयत दलित विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या मृत्युची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करुन दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज केली.
लातुरच्या औसा तालुक्यातील टाका या गावातील दिवंगत अनुष्का पाटोळे च्या निवासस्थानी
ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट दिली. यावेळी दिवंगत अनुष्का पाटोळेच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली ना. रामदास आठवले यांनी वाहिली. दिवंगत अनुष्का पाटोळे ची आई व वडिल तसेच सर्व कुटूंबियांची ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. या प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी अनुष्का पाटोळे च्या आईने आपल्या मुलीची आत्महत्या झाली नसुन हत्या झाल्याचा आरोप केला. या प्रकरणी आपण आम्हाला न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी ना. रामदास आठवले यांच्याकडे केली. यावर ना. रामदास आठवले यांनी दिवंगत अनुष्का पाटोळेच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणाची सखोलात सखोल चौकशी करण्यासाठी ही चौकशी सीआयडी मार्फत करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीने भेट घेणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देवून या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. तसेच या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
दिवंगत अनुष्का पाटोळे ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. अवघ्या साडे अकरा वर्षाची मुलगी होती. ती स्वतः आत्महत्या करणं अशक्य असल्याच मत तिच्या कुटुबियांनी मांडले आहे.
दिवंगत अनुष्का पाटोळे ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. तिला संविधान तोंडपाठ होते. ती महात्मा ज्योतीबा फुलेंच्या जीवनावर चांगले भाषण करत होती. अत्यंत हुशार विद्यार्थिनी असल्यामुळे गुणवत्तेवर तिने इयत्ता 6 वीत जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला होता. अवघ्या 6 महिन्यातच त्या विद्यालयात तिचा संशयास्पद मृत्यु झाला. तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबियांना कळविण्यात आले. मात्र दिवंगत अनुष्का पाटोळे च्या आईने अनेक प्रश्न व्यवस्थेला विचारलेले आहेत. काबाड कष्ट करुन, मोलमजुरी करुन त्यांनी आपल्या मुलीला शिकविले. अवघ्या 11 वर्षाच्या आपल्या मुलीचा मृत्यु हा संशयास्पद मृत्यु असल्याचा अनुष्का च्या आईने म्हटलेले आहे. या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेवुन ना.रामदास आठवले यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणात केवळ 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित सर्व प्रिन्सीपल आणि सर्व संबंधीत जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करुन त्यांची चौकशी करण्यात आली पाहिजे. यासाठी सीआयडी मार्फतच चौकशी केली पाहिजे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
अनुष्का पाटोळे या मुलीच्या मृत्युला जे कारणीभूत आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा करुन पाटोळे परिवारास आपण न्याय मिळवुन देणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिवंगत अनुष्का पाटोळेच्या कुटुबांस 1 लाख रुपयाची सांत्वनपर मदत करणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी जाहीर केले. राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीन दिवंगत अनुष्का पाटोळेच्या कुटुंबाला एकुण 4 लाखाची सात्वंनपर मदत करणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता 1 लाख रुपयांचा त्यांना देण्यात आलेला आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने 4 लाखाचा सात्वंनपर निधी सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे देण्यात येणार आहे.
दिवंगत अनुष्का पाटोळेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतुनही आर्थिक मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तसेच या कुटुंबातील एका व्यक्तीस राज्य शासनाची नोकरी मिळवुन देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.
दिवंगत अनुष्का पाटोळे चा मृत्यु हा संशयास्पद आहे. तिचा मृतदेह हा विद्यालयातुन हॉस्पीटलमध्ये पोलीसांच्या अनुपस्थीतीत नेण्यात आला. गळफास घेतलेला तिचा मृतदेह हा पोलीसांनी पंचनामा केल्यानंतरच रुग्णालयात न्यायला पाहिजे होता. तिच्या डोक्याला माती लागली होती, अवघ्या 11 वर्षाची मुलगी ती टॉवलने कशी काय फास घेवु शकते? बसुनच गळफास कसा काय घेतला जावु शकतो? जवाहर विद्यालयातील मुलींच्या कक्षाबाहेरील सीसीटीव्ही फुटेजही मिळायला पाहिजे. ते बंद असल्याचे व्यवस्थापन का सांगत आहे? या प्रकरणातील जवाहर विद्यालयातील प्रिन्सिपॉल; शिक्षक, शेफ, वॉचमन आदि जे परमनंट स्टाफ आहेत त्या सर्वांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी दिवंगत अनुष्का पाटोळे कुटुंबीयाकडुन करण्यात आली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या समवेत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे; युवक राज्य अध्यक्ष पप्पू कागदे; राज्य सचिव चंद्रकांत चिकटे; डॉ सुधाकर गुळवे; औसा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख
