February 24, 2026

किस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग येथे KeyFest 2026 उत्साहात संपन्न

0
IMG-20260224-WA0009
Spread the love

पुणे : किस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे वार्षिक महोत्सव “KeyFest 2026” अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा बहुआयामी महोत्सव सांस्कृतिक, क्रीडा तसेच राष्ट्रीय अभिमान जागवणाऱ्या उपक्रमांनी समृद्ध ठरला.

या मुख्य महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम “Encore 2026” आणि क्रीडा स्पर्धा “Key Karandak 2026” यांचे भव्य आयोजन करण्यात आले. “Encore 2026” मध्ये नृत्य, गायन, नाट्याविष्कार, समूह सादरीकरणे आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. पारंपरिक दिन, बॉलिवूड दिन, चॉकलेट डे, मिसमॅच डे आणि ट्विन्स डे अशा थीम डेजमुळे संपूर्ण परिसर रंगतदार आणि उत्साही वातावरणाने फुलून गेला. आकर्षक वेशभूषा आणि कल्पक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

“Key Karandak 2026” अंतर्गत क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेनिस, टेबल टेनिस, दोरीखेच (Tug of War) आणि धावणे (Running) अशा विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. ३५० पेक्षा अधिक सामने खेळविण्यात आले. विभागनिहाय चुरशीच्या लढतींमध्ये विद्यार्थ्यांनी जिद्द, शिस्त आणि उत्कृष्ट खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवले.

महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची उपस्थिती. आपल्या मनोगतात त्यांनी संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक करत संस्थापक संचालक प्रा. यशोधन सोमन यांचे अभिनंदन केले. “ओसाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचे कार्य त्यांनी केले आहे,” असे गौरवोद्गार काढत विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधांचा योग्य लाभ घेऊन व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप कदम यांनी अशा उपक्रमांमुळे नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि संघभावना वृद्धिंगत होत असल्याचे नमूद केले. शिक्षणासोबत कला, क्रीडा व सांस्कृतिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी शिस्त, वेळेचे नियोजन आणि सातत्य यावर भर दिला.

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रा. गुजर यांच्या प्रभावी व्याख्यानातून महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. तसेच “शिवशंभू ढोल-ताशा पथक” यांच्या दमदार सादरीकरणामुळे परिसर देशभक्तीच्या भावनेने भारून गेला.

“Encore 2026” चे समन्वयक प्रा. सुवर्णा फुले आणि “Key Karandak 2026” चे समन्वयक प्रा. पंकज करांडे यांनी उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले. सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी आयोजक समितीच्या परिश्रमांमुळे “KeyFest 2026” हा महोत्सव संस्मरणीय व प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थापक संचालक प्रा. यशोधन सोमन, संचालक डॉ. प्रशांत कसबे तसेच संचालक अंकित लुनावत यांनी सर्व समन्वयक, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी आयोजक समितीचे अभिनंदन केले. भविष्यातही अशाच भव्य आणि शिस्तबद्ध उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी