शिवरायांनी गिरिदुर्ग, जलदुर्गांसोबत स्वराज्यासाठी लढणारे ‘नरदुर्ग’ उभारलेशिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील ; सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त उत्सवाचे आयोजन
पुणे : क्रांतिकारकांनी व महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले. त्यामुळे त्यांनी क्रांती घडविताना शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले.पराक्रमाचा एका एका धडा गिरवत शिवरायांनी रयतेत विश्वास निर्माण केला. अनेक राजांनी गिरिदुर्ग, जलदुर्ग बांधले, पण नरदुर्ग उभारणारे केवळ छत्रपती शिवाजी महाराज होते. स्वराज्यासाठी लढणारी आणि मरणारी माणसे त्यांनी घडविली, असे मत इतिहास अभ्यासक, लेखक व शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.
सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त उत्सवाचे आयोजन बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे करण्यात आले. यामध्ये प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी आपले विचार मांडले.
प्रा.नितीन बानगुडे पाटील म्हणाले, समुद्रामार्गे येणारे अरबी लोक आपल्या जनतेवर अत्याचार करीत असत. माणसांना गुलाम बनवून व्यापार सुरू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना याचा संताप होता. त्यामुळे त्यांनी स्वराज्याचा आरमाराला सांगितले की अरबी चाचे जनतेला त्रास देत आहेत, त्यांचा बंदोबस्त करा. ज्यावेळी अरबांची गलबते कोकणात आली, तेव्हा त्यांच्याशी लढा देत मस्कत पर्यंत मराठयांचे आरमार गेले. तेथून १७५ अरब कैद करून महाराजांसमोर आणण्यात आले. महाराजांनी वासोट्याच्या किल्ल्यात म्हणजे व्याघ्रगड येथे कैद करून ठेवत त्यांना शिक्षा दिली. ही महाराजांची दूरदृष्टी होती.
ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याचे बीज तर पेरलेच, पण स्वराज्य उभे करण्याची उर्मी निर्माण केली. आक्रमकांच्या अन्याय व अत्याचारापासून रयतेला मुक्त केले आणि अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी आत्मविश्वासही दिला. छत्रपती शिवाजी महाराजांना, त्यांच्या पराक्रमाला आपण विसरलो म्हणून इंग्रजाना १५० वर्षे राज्य करता आले, असेही त्यांनी सांगितले.
शिवजयंतीच्या दिवशी गुरुवारी (दि.१९) दुपारी ४ वाजता पारंपरिक वाद्यवादन होणार असून सायंकाळी ७ वाजता शिवसाई प्रतिष्ठान ट्रस्ट निर्मिती गणेश लोणारे व सहकारी प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील मृत्युंजय हे धगधगते महानाटय सादर होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी केले आहे.
- फोटो ओळ : सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त उत्सवाचे आयोजन बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे करण्यात आले. यामध्ये प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी आपले विचार मांडले.
