विद्यार्थ्यांनी जाणून घेतला शिवकालीन सागरी सामर्थ्याचा वारसा
आदर्श शिक्षण मंडळी, पुणे या शिक्षण संस्थेच्या सौ.सुशीलाबाई वीरकर हायस्कूल तसेच नातूबाग शैक्षणिक संकुल, माजी विद्यार्थी सन २००० बॅच आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन आरमार प्रदर्शनाचे आयोजन
पुणे : शिवकालीन सागरी आरमार…जहाजांची रचना, सागरी किल्ले व शस्त्रसामग्री यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या आरमारामुळे स्वराज्याची सागरी सीमा सुरक्षित झाली आणि परकीय आक्रमणांना प्रभावी उत्तर देता आले. यावेळी वापरण्यात आलेले नौका, तोफा, शस्त्रांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन पाहत विद्यार्थ्यांनी सागरी शिवकालीन सागरी सामर्थ्य जाणून घेतले.
शुक्रवार पेठेतील आदर्श शिक्षण मंडळीच्या सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूल तसेच नातूबाग शैक्षणिक संकुल, माजी विद्यार्थी सन २००० बॅच आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळा २०२६ निमित्त १७ व १८ फेब्रुवारी रोजी प्रशालेच्या प्रांगणात ‘शिवकालीन सागरी आरमार व शस्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, प्रमुख पाहुणे माजी शिक्षण अधिकारी , समुपदेशक डॉ. अनिल गुंजा, वीरकर हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक महादेव माने, आदर्श विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका अनुजा देवभानकर, आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निलिमा लांजेवार, नगरसेविका स्नेहा माळवदे उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ७ यावेळेत खुले आहे.
विद्यार्थ्यांना इतिहास विषयाची गोडी लागावी, प्रत्यक्ष शस्त्रसामग्री पाहण्याची संधी मिळावी आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाबद्दल जागरूकता वाढावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात शिवकालीन जहाजांची मॉडेल्स, तोफा, तलवारी, ढाली तसेच सागरी किल्ल्यांची माहिती दृश्य स्वरूपात मांडण्यात आली आहे.
डॉ. मिलिंद भोई म्हणाले, समाजाचा आधार शिक्षक आहेत. निरागस मुले शिक्षकांकडे आदर्श म्हणून पाहतात. त्यामुळे शिक्षकांवर मोठी जबाबदारी असते. माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबविलेला स्वराज्याचे आरमार प्रदर्शन उपक्रम अत्यंत सुंदर असून इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे.
डॉ. अनिल गुंजाळ म्हणाले, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, जातीयता, व्यसनाधीनता आणि आत्महत्या या पाच गोष्टी टाळल्या तर छत्रपतींनी साकारलेले स्वराज्य अधिक सक्षम राहील. शिक्षकांचे योगदान अमूल्य असून त्यांनी घडवलेले माजी विद्यार्थी हीच त्याची साक्ष आहे. नगरसेविका स्नेहा माळवदे यांनी मनोगत व्यक्त केले.
फोटो ओळ : शुक्रवार पेठेतील आदर्श शिक्षण मंडळीच्या सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूल तसेच नातूबाग शैक्षणिक संकुल, माजी विद्यार्थी सन २००० बॅच आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळा २०२६ निमित्त १७ व १८ फेब्रुवारी रोजी प्रशालेच्या प्रांगणात ‘शिवकालीन सागरी आरमार व शस्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ७ यावेळेत खुले आहे.
