February 15, 2026

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

0
Screenshot_20260214_233934_WhatsApp
Spread the love
  • ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा अनुभव

पुणे : आकाशात उडणारे हेलिकॉप्टर अनेकांनी पाहिलेले असते; पण त्यात बसण्याचा अनुभव प्रत्येकाला मिळत नाही. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ओय फाउंडेशन आणि महालक्ष्मी एव्हिएशन यांनी दिव्यांग मुलांसाठी असा क्षण साकारला, ज्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज खुलले. ओवायई फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. सिमरन जेठवानी यांच्या पुढाकाराने व महालक्ष्मी एव्हिएशनचे नितीन गोते, कॅप्टन नितीन वेल्डे यांच्या सहकार्याने ३५ मुलांना सहा मिनिटांची हेलिकॉप्टर सफर घडवून आणण्यात आली.

हेलिकॉप्टर जमिनीवरून अलगद वर झेपावताच मुलांनी आनंदाने हात हलवत खाली पाहिले. काहींनी पहिल्यांदाच शहराला वरून पाहत आश्चर्य व्यक्त केले, तर काहींच्या डोळ्यांत उत्साहाश्रू चमकले. ‘आज आम्हीही उडालो अन आमची स्वप्नपूर्ती झाली,’ असे एका मुलाने हसत सांगितल्यावर उपस्थितांचे मन भारावले. हेलिकॉप्टर उड्डाण करताच सहभागींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह उपस्थितांसाठीही भावूक करणारा ठरला.

डॉ. सिमरन जेठवानी म्हणाल्या, “या मुलांना फक्त एक राईड नव्हे, तर आयुष्यभर जपून ठेवतील अशी आठवण द्यायची होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचा उद्देश सफल झाला. हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर संवेदनशीलतेचा संदेश होता. आनंद वाटल्यानेच वाढतो. छोट्या कृतीतून मोठा आनंद देत समाजात समावेशकतेची भावना दृढ करणारा हा दिवस आहे. दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे, तर संधी आणि सन्मान देणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, समाजाशी संवाद वाढतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो. समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळाव्यात हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.”

दिव्यांगांना हेलिकॉप्टर राईड घडविण्याची विनंती डॉ. जेठवानी यांनी आमच्याकडे केली. त्यानंतर सामाजिक भावनेतून आम्हीही याला प्रतिसाद दिला आणि आज ३५ मुलांना हा अविस्मरणीय आनंद देऊ शकलो, याचे समाधान वाटतेय. समाजात समावेशकतेचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून, भविष्यात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संस्थांचा मानस आहे, असे नितीन गोते यांनी सांगितले.

आकाशातून जमिनीवरील नजराणा खूप सुंदर दिसत होता, झाडे, नदी, गाड्या, माणसे छोटी-छोटी दिसत होती, अशी भावना व्यक्त करीत सहभागींनी आयोजकांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी