February 14, 2026

मुठा नदी पात्र स्वच्छतेने साजरा झाला ‘माय रिव्हर माय व्हॅलेंटाइन’ उपक्रमवर्शिप अर्थ फाउंडेशन सह विविध संस्थांचा सहभाग : ५ हजार पुणेकरांचा सहभाग : मुळा मुठा पुरस्काराचे देखील वितरण

0
IMG-20260214-WA0017
Spread the love

पुणे – स्वच्छ पुणे हा युवकांचा संकल्प… स्वच्छतेची सुरुवात युवकांकडून… स्वच्छ पुणे संकल्प २०२६… असे फलक हाती घेत युवकांनी मुठा नदीच्या संवर्धनासाठी व पर्यावरणाबाबत जनजागृती केली. नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवत ५ हजार पुणेकरांनी ‘माय रिव्हर माय व्हॅलेंटाइन’ उपक्रमात सहभाग घेत व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

निमित्त होते, वर्शिप अर्थ फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माय रिव्हर माय व्हॅलेंटाइन’ या उपक्रमाचे. भिडे पूल परिसर, नवी पेठ, मुठा नदी पात्र येथे हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा उपक्रमाचे ६ वे वर्ष होते. सामाजिक कार्यकर्ते शामाला देसाई यांना यंदाचा मुळा मुठा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वर्शिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक पराग मते आदी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक सहभागी झाले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फाउंडेशनच्या आम्रपाली चव्हाण, समीर पौलस्ते, दिनेश कदम, विद्यार्थी प्रतिनिधी हार्दिक सोनवणे,दुर्गेश बलके, कौस्तुभ येवले, ओंकार घुले यांसह सर्व कार्यकर्त्यांनी उपक्रमासाठी मेहनत घेतली.

ज्याप्रमाणे अजित पवार सकाळी लवकर उठून आपल्या कामाला सुरुवात करत होते, त्याच पद्धतीने सकाळी मुठा स्वच्छता अभियान राबवत तरुणांनी त्यांना आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली. पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सीबीसी – सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन (भारत सरकार), एनएसएस विभाग तसेच ‘माय भारत’ – युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. नदी स्वच्छता मोहीम, रील्स स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच पर्यावरण जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण जपण्याचा अनुभव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

पराग मते म्हणाले, नदी स्वच्छतेसाठी केवळ एकदिवसीय मोहिमा पुरेशा नाहीत. म्हणूनच आम्ही शिपको कंपनीच्या सहकार्याने मुठा नदीमध्ये ‘ट्रॅश बूम’ ही शाश्वत व प्रभावी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे नदीत वाहून येणारा प्लास्टिक कचरा, निर्माल्य, फुले, नारळ तसेच इतर तरंगणारा कचरा अडवून त्याचे नियोजनबद्ध संकलन करता येते. ‘ट्रॅश बूम’ ही नदी स्वच्छतेसाठी दीर्घकालीन उपाययोजना असून, यामुळे नदीचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही जपले जाईल. नागरिकांमध्ये नदी संवर्धनाबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे. या उपक्रमामध्ये युवकांचा सहभाग वाढावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

  • फोटो ओळ : वर्शिप अर्थ फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माय रिव्हर माय व्हॅलेंटाइन’ या उपक्रमाचे भिडे पूल परिसर, नवी पेठ, मुठा नदी पात्र येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध संस्थांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी