February 14, 2026

भारतीय सैन्याला ‘संरक्षण’ सेना नव्हे तर ‘सशस्त्र’ सेना म्हणाएअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) ; ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे हुतात्मा सैनिकांच्या ३५ वीर नारींचा सन्मान सोहळा – दी महार रेजिमेंट, १३ व्या बटालियनच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजन

0
IMG-20260213-WA0021
Spread the love

पुणे : देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो. जो देशासाठी बलिदान देतो, त्याला स्वर्ग मिळतो, असे म्हणतात. त्यामुळे अशा सैनिकांना आम्ही नमन करतो. समाज आणि सैन्यदल हे वेगळे नाही. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाज सर्वांना ऊर्जा देतो, तो नेहमी सैन्याच्या पाठीमागे उभा असतो. आपण कितीही एकमेकांत भांडलो तरी देशावर संकट आले की सगळे देशवासी एकत्र येतात. युद्ध आवश्यक नाही पण युद्धाची तयारी गरजेची आहे. यामुळे आपल्याकडे कोणी डोळे वर करून बघणार नाही. आम्हाला सशस्त्र सेना म्हणा, संरक्षण सेना म्हणू नका, असे मत एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने दी महार रेजिमेंट १३ व्या बटालियन च्या हीरक महोत्सवानिमित्त हुतात्मा सैनिकांच्या वीर नारींचा सन्मान सोहळा स.प.महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेजर जनरल बिनॉय पूनेन (निवृत्त), १३ महार रेजिमेंटचे कमांडिंग आॅफिसर कर्नल संजीत फुगत, ज्येष्ठ संपादक अरुण खोरे, सुभेदार मेजर (ऑर्डीनरी कॅप्टन) बापू पोळके, लेफ्टनंट कर्नल नरेंद्र पाठक, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बटालियनमधील हुतात्मा सैनिकांच्या ३५ वीर पत्नी आणि वीर मातांचा सन्मान यावेळी करण्यात आला. प्रत्येकी २५ हजार रुपये, साडीचोळी, सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरुप होते.

अरुण खोरे म्हणाले, भारतीय लष्करामध्ये महार रेजिमेंट चे फार मोठे योगदान आहे. सन १९४१ साली ब्रिटिश सरकारने संरक्षण सल्लागार परिषद स्थापन केली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे भाग होते. त्यांनी याविषयात अनेक चांगले निर्णय घेतले, हे आपल्याला आज दी महार रेजिमेंट १३ व्या बटालियन च्या हीरक महोत्सवाच्या वर्षी विसरता येणार नाही. मानवता विकसित झाली तर युद्धाची गरज पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

मेजर जनरल बिनॉय पूनेन म्हणाले, समाजाला हे समजते की सैन्याची काळजी किती घ्यावी. बलिदान नसेल तर जिंकणे शक्य नाही. ज्या सैनिकांनी बलिदान दिले, त्यांच्या पत्नी आज सन्मानित होत आहेत, हे अभिमानास्पद आहे.

कर्नल संजीत फुगत म्हणाले, आजच्या कार्यक्रमात केवळ वीर नारींचा सन्मान नाही तर हा संदेश आहे की ज्यांच्या पतीने बलिदान दिले, त्या नारी एकट्या नाहीत तर समाज त्यांच्या पाठीशी आहे. समाज आणि सैन्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आज समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे, हे महत्वाचे आहे.

सुनील रासने म्हणाले, लष्कराशी निगडित कार्यक्रम असेल तर आम्हाला नेहमीच आनंद वाटतो. आम्ही समाजसेवा करतो आणि सैनिक म्हणून तुम्ही देशसेवा करता. या दोन्ही सेवा एकत्र यायला हव्यात.

महेश सूर्यवंशी म्हणाले, सन २०११ पासून ट्रस्टतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला ६ मराठा बटालियनमधील सैनिकांच्या ६० वीर नारींना सन्माननित करण्यात आले होते. त्यानंतर सन २०१७ मध्ये ट्रस्टच्या १२५ व्या वर्षी १२५ वीर नारींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात ७५ व्या वर्षी ७५ वीर नारींचा सन्मान करण्यात आले. प्रत्येक कार्यक्रमात वीर नारींना प्रत्येकी २५ हजार रुपये, साडीचोळी, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. भारतीय सैनिकांनी आणि त्यांच्या वीर नारींनी देशाप्रती दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो.

  • फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने दी महार रेजिमेंट १३ व्या बटालियन च्या हीरक महोत्सवानिमित्त हुतात्मा सैनिकांच्या ३५ वीर नारींचा सन्मान सोहळा स.प.महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवर व वीर नारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी