शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांना पुणेकरांतर्फे अभिवादनगोडबोले यांचा २३ वा स्मृतीदिन ; लष्करातील जवानांची मानवंदना
पुणे : भारत माता के जय… शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले अमर रहे… च्या घोषणांनी थोरले बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानाचा परिसर दुमदुमून गेला. देशभक्तीने भारलेल्या वातावरणात पुणेकरांसह भारतीय लष्करातील जवान व सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील मानवंदना दिली.
सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांतर्फे महाराणा प्रताप उद्यानात असलेल्या स्मारकासमोर गोडबोले यांचा २३ वा स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांचे वडील चंद्रकांत गोडबोले, ६३ इंजिनिअरिंग रेजिमेंट चे सुभेदार विजयकुमार, आनंद सराफ, अशोक मेहेंदळे, शिरीष मोहिते, शाहीर हेमंतराजे मावळे, विष्णू ठाकूर आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी स्मारकाचे पूजन करीत शहिदांचे स्मरण केले. लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, फुलगाव यांनी संचलन करीत मानवंदना दिली. तसेच राष्ट्रगीत म्हणून देशभक्तीची भावना देखील उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा जागृत करण्यात आली. ज्यांना या कार्यक्रमाला येता आले नाही. त्यांनी पुढील तीन दिवस स्मारकाला भेट देऊन अभिवादन करावे, असं आवाहन यावेळी करण्यात आले.
