February 15, 2026

रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठीआयोजित विविध स्पर्धांची महाअंतिम फेरी रविवारी रंगणार

0
IMG-20260130-WA0007
Spread the love


पुणेः- शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनमूल्यांची शिकवण मिळावी, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध स्पर्धांची महाअंतिम फेरी रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत टाटा हॉल, बीएमसीसी महाविद्यालय येथे रंगणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष विशाल कुलकर्णी आणि रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या सचिव गौरी गुप्ते यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या न्यू जनरेशन डायरेक्टर रेणुका माडीवाले आणि पब्लिक इमेज डायरेक्टर अमृता कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष विशाल कुलकर्णी म्हणाले की, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील एक नामवंत क्लब आहे. गेल्या २३ पेक्षा अधिक वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीतर्फे वेगवेगळे समाजोपयोगी प्रकल्प राबविले जातात. पुणे शहरातील अनेक नामवंत मंडळी या क्लबचे सभासद आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी तर्फे दरवर्षी शाळेतील मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विचारमूल्य रूजविण्याच्या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, चित्रकला, पोवाडा गायन आणि टाकावूपासून टिकाऊ निर्मिती अशा पाच प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या २६ शाळांमधील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला. सध्या शालेय मुलांना उपलब्ध होत असलेले मोबाईलसारखे तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांसारखी साधने यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता, ताणतणाव, निराशा अशा अनेक समस्या दिसून येतात. त्यातून अनेक समाज विघातक कृत्ये घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असेलल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जीवमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रूजवून त्यांच्या विचारशक्तीमध्ये सकारात्मक बदल करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.
यावेळी बोलताना न्यू जनरेशन डायरेक्टर रेणुका माडीवाले म्हणाल्या की, या स्पर्धांच्या पहिल्या फेरीमध्ये पुणे शहरातील २६ शाळांमधील सुमारे चार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून एक हजार विद्यार्थ्यांची शाळा पातळीवर निवड करण्यात येऊन त्यांची पाच झोनमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. यातील साडेतीनशे विद्यार्थ्यांची निवड महाअंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. सदर उपक्रमाची मोहीम आणि स्पर्धांमध्ये जागृती ब्लाइंड स्कूल आळंदी आणि इथल्या गांधी भवन च्या ब्लाइंड स्कूल मधल्या मुली यांचे पोवाडा चे सादरीकरण आणि त्यांची कौशल्ये ,निबंध स्पर्धेतील त्यांचे निबंध लेखन हा महत्त्वाचा भाग समाविष्ट आहे . तसेच थोडीशी अधू-दृष्टी असणाऱ्या विद्यार्थिनींनी चित्रकला स्पर्धेतही कौशल्य दाखवले आणि पोवाडा स्पर्धेत स्वतः गायन व वादन देखील केले.
त्या साडेतीनशे विद्यार्थ्यांची महाअंतिम फेरी रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत टाटा हॉल, बीएमसीसी महाविद्यालय येथे रंगणार आहे. यानंतर दुपारी दोन वाजता काही निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल आणि दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा असेल .रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ) श्री संतोष मराठे यांच्या शुभहस्ते तो होणार आहे. या कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे माजी प्रांतपाल आणि पी एन जी एक्सक्लुजीव चे मालक श्री अभय गाडगीळ तसेच प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री अजित आपटे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी समाजातील शिवसृष्टी, मावळा गेमॲप ग्रुप अशा विविध संस्थांनी आर्थिक सहकार्य केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी