April 1, 2026

मोठ्या मॉल्सच्या स्पर्धेतही ग्राहक पेठ ठामपणे उभी

0
IMG-20260107-WA0055
Spread the love


राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे मत : ग्राहक पेठेच्या ३४ व्या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : स्थानिक व स्वदेशी वस्तूंच्या खरेदीला चालना देण्याचा विचार सुरू झाला, त्या काळात मॉलची संकल्पनाही अस्तित्वात नव्हती. घरगुती वस्तू योग्य दरात उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सहकारी तत्त्वावर ग्राहक पेठेची स्थापना करण्यात आली. आज मोठ्या मॉल्सच्या स्पर्धेतही ग्राहक पेठ सक्षमपणे उभी आहे, हेच तिचे खऱ्या अर्थाने यश असल्याचे मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.

ग्राहक पेठेच्या ३४ व्या तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. सदाशिव पेठेतील खजिना विहीर चौकात ग्राहक तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्राहक पेठेच्या उपाध्यक्षा संध्या भिडे, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज अँड कंपनीचे राजेश शहा, तसेच कोहिनूर कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर फिरोज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, मागील ३४ वर्षांपासून ‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या संकल्पनेतून ग्राहक पेठेचा तांदूळ महोत्सव आयोजित केला जात आहे. खरा बासमती कोणता, बासमतीमधील तिबार-दुबार प्रकार म्हणजे काय, यासारखी उपयुक्त माहिती या महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांना दिली जाते. वर्षभराच्या साठवणीसाठी पुणेकरांना उत्तम दर्जाचा तांदूळ रास्त दरात उपलब्ध करून देण्याची परंपरा या महोत्सवातून जपली जात असून दरवर्षी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाढत आहे.

सूर्यकांत पाठक म्हणाले, उत्पादकांकडून थेट ग्राहकांपर्यंत वर्षाच्या साठवणीसाठी तांदूळ योग्य दरात पोहोचावा, या हेतूने तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले जाते. बासमतीपासून आंबेमोहर, इंद्रायणीपासून कोलम-चिनोरपर्यंत सुमारे ४८ प्रकारचे तांदूळ या ठिकाणी उपलब्ध आहेत. यावर्षी आंबेमोहर तांदळाचे दर बासमतीपेक्षा अधिक असून ते पुढेही वाढण्याची शक्यता आहे. मात्र बाजारातील दर वाढले तरी २५ जानेवारीपर्यंत महोत्सवात त्याच दरात ग्राहकांना तांदूळ उपलब्ध करून दिला जाणार आहे.

राजेश शहा म्हणाले, ग्राहक पेठ गुणवत्ता आणि विश्वासासाठी ओळखली जाते. तांदूळ महोत्सव ही संकल्पना ग्राहक पेठेची असून, तिच्या सहकार्यामुळेच आम्ही उत्पादक थेट ग्राहकांपर्यंत तांदूळ पोहोचवू शकत आहोत, असेही त्यांनी सांगितले. महोत्सवासाठी अहमदाबादहून ग्राहक पेठेत तांदूळ खरेदीकरिता ज्योत्स्ना तांबे उपस्थित होत्या.

फोटो ओळ : ग्राहक पेठेच्या ३४ व्या तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी