सोपानदेवी ग्रंथाचा पुण्यात पारायण सोहळाश्री सोपान देवांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजन ; सासवड व जेजुरी येथेही पारायणे होणार
पुणे : श्री सोपान देवांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सोपान देवांनी गीतेला समश्लोकी रचलेल्या सोपानदेवी ग्रंथाचे सामुदायिक पारायण मार्गशीर्ष वद्य दशमी रोजी जुनी तापकीर गल्ली बुधवार पेठेतील हरभरे राम मंदिर, येथे पार पडले. यामध्ये ५०० पेक्षा अधिक भाविकांनी सहभाग घेतला.
ह.भ.प. नारायण महाराज गोसावी सासवडकर यांनी सोपान देवी ग्रंथाचे महत्व समजून सांगितले. यावेळी ह.भ.प. वाकलकर गुरुजी, ह.भ.प. धनंजय काळे महाराज, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरचे विश्वस्त राजेंद्र बलकवडे, जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे , ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानाच्या विश्वस्त संगीता ठकार, दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव आदी उपस्थित होते.
राम रक्षा हनुमान चालीसेने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सोपान देवी मध्ये भगवद्गीतगीता ज्ञानेश्वरी प्रमाणेच १८ अध्याय आहेत. त्याचे महात्म्य यावेळी उपस्थितांसमोर उलगडले. पारायण केलेल्या भक्तांना सोपान देवी ग्रंथ भेट देण्यात आला.पुणे शिरवळ, कोंढवा बुद्रुक आदी ठिकाणाहून भक्तांनी यात सहभाग घेतला. पारायणा नंतर महाआरती, महा प्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यापुढे सासवड व जेजुरी येथेही ही पारायण होणार आहेत.
ह.भ.प. नारायण महाराज गोसावी सासवडकर म्हणाले, सर्वसामान्यांना समजावे अशा शब्दात ज्ञानेश्वरी लिहिली. त्याचप्रमाणे सोपानदेवी ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. गीतेत भक्ती, ज्ञान, कर्मयोग सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे ज्ञान कसे मिळवावे आणि भगवंतप्राप्ती कशी करावे, हे सोपानदेवी मध्ये सांगितले आहे. याला ७५० वर्षे पूर्ण होत असून याची पारायणे राज्यभर व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. त्यातील पहिले पारायण पुण्यात झाले.
- फोटो ओळ : श्री सोपान देवांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सोपान देवांनी गीतेला समश्लोकी रचलेल्या सोपानदेवी ग्रंथाचे सामुदायिक पारायण मार्गशीर्ष वद्य दशमी रोजी जुनी तापकीर गल्ली बुधवार पेठेतील हरभरे राम मंदिर, येथे पार पडले. यामध्ये ५०० पेक्षा अधिक भाविकांनी सहभाग घेतला.
