February 15, 2026

दत्तनामाच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने साजरा झाला दत्तजन्म सोहळाश्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे ; १२८ व्या दत्तजन्म सोहळ्यानिमित्त दत्तमहाराजांच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी

0
IMG-20251204-WA0032
Spread the love


पुणे : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या गजरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दत्तजन्माचा सोहळा पार पडला. शेकडो भाविकांच्या गर्दीने फुललेल्या दत्तमंदिरामध्ये सायंकाळी ६ वाजता पाळणा होताच पुष्पवृष्टी झाली. नेत्रदीपक दत्तजन्म सोहळा डोळ्यात साठविण्याकरीता भाविकांनी मोठी गर्दी केली.

बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर भक्तिमय झाला होता. मंदिरात १२८ व्या वर्षी साज-या झालेल्या दत्तजन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. कीर्तनकार ह.भ.प. विश्वासबुवा कुलकर्णी यांच्या कीर्तनानंतर झालेल्या दत्तगुरुंच्या जयघोषात जन्मोत्सव साजरा झाला.

दत्तमहाराजांच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली. गुरुवारीच पौर्णिमा आल्यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला होता. प्रदोषकाळी रोहिणी नक्षत्रावर श्री दत्तजन्म सोहळा संपन्न झाला . पाळण्यावर पुष्पवृष्टी करून दिगंबरा, दिगंबरा… असा जयघोष करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उप उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते. तसेच आमदार उल्हास पवार देखील यावेळी उपस्थित होते.

त्यानंतर दत्तगुरुंच्या पादुकांची भव्य पालखी नगरप्रदक्षिणा मंदिरातून वाजत-गाजत निघाली. वैभवशाली सुवर्णरथ, पारंपरिक दिंडी, शंखध्वनी पथक, अश्व बग्गी, नगारा वादन व वाद्यपथकांच्या जल्लोषात हजारो भाविक देखील सहभागी झाले होते. दत्तमंदिरापासून निघालेली पालखी रामेश्वर चौक येथे स्वामी समर्थ मठात आरती करून पुढे टिळक पुतळा मंडई, शनिपार, अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ मार्गे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पालखीवर पुष्पवृष्टी करून दत्तनामाचा जागर आणि आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी समोर भाविक साष्टांग दंडवत घालून त्यावरुन पालखी ओलंडा घेत पुन्हा दत्त मंदिरात आली.

सकाळी ६ वाजता ट्रस्टचे माजी विश्वस्त चंद्रशेखर व नूतन हलवाई यांच्या हस्ते लघुरुद्र, त्यानंतर पूनम व पवन अष्टेकर यांच्या हस्ते श्री दत्तयाग झाला. सकाळी ८ वाजता प्रात: आरती श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शिरगावच्या कार्यकारी विश्वस्त विभावरी व रवी जाधव यांच्या हस्ते तसेच दुपारी १२.३० वाजता ए बी आय एल उद्योग समूहाचे अध्यक्ष अविनाश व गौरी भोसले यांच्या हस्ते माध्यान्ह आरती करण्यात आली. याशिवाय क्विक हिल चे मॅनेजिंग डायरेक्टर कैलास व अनुपमा काटकर, सुहाना मसालाचे राजकुमारशेठ चोरडिया, विठ्ठलशेठ मणियार, अभय मांढरे, अंकुश काकडे यांची विशेष उपस्थिती होती. तर, श्री योगाभ्यानंद माधवनाथ महाराज इंदोर यांच्यातर्फे विशेष अभिषेक माधव साने यांचे हस्ते करण्यात आला. दिवसभर भाविकांना प्रसाद वाटप सुरू होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दत्तमहाराजांचे दर्शन घेतले.

दत्तजन्म सोहळ्यानंतर सायंकाळी ७ वाजता सायं आरती पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या हस्ते झाली. तर निशा आरती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते झाली. भक्तांसाठी सकाळी ६ पासून मंदिर खुले करण्यात आले असले तरी मध्यरात्री उशीरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

फोटो ओळ : बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर भक्तीमय झाला होता. मंदिरात १२८ व्या वर्षी साज-या झालेल्या दत्तजन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. कीर्तनकार ह.भ.प. विश्वासबुवा कुलकर्णी यांच्या कीर्तनानंतर झालेल्या दत्तगुरुंच्या जयघोषात जन्मोत्सव साजरा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी