कसबा पेठेत वाड्यात साकारला मणी-मल्ल वधाचा देखावाचंपाषष्ठी निमित्त स्वरूपा फाऊंडेशनतर्फे आयोजन ; कलाकार देवदत्त नागे यांनी दिली भेट
पुणे : मणि-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून श्री खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले. त्याचे स्मरण करीत साजऱ्या होणाऱ्या चंपाषष्ठी निमित्त कसबा पेठेतील वाड्यात मणी-मल्ल वधाचा देखावा साकारण्यात आला आहे. फडके हौद चौकाजवळील स्वरूपा फाऊंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष तुषार शिंदे यांनी वाड्यातील त्यांच्या घरामध्ये हा देखावा साकारला आहे.
तब्बल ६ फूट उंच आणि १० फूट रुंद असा हा देखावा साकारण्यात आला आहे. यामध्ये जागरण गोंधळ, तळी भंडारा, कुळधर्म, कुळाचार असे सर्व साकारण्यात आले असून याचे कामे मागील ३० दिवसांपासून सुरु होते. याकरिता तुषार शिंदे, अभी निजामपूरकर, प्रसाद कारंजकर, श्रीनिवास टेमगिरे, ओमकार कवळे, शिवेन शिंदे, रवींद्र शिंदे, ज्ञानेश्वर पवार, संभाजी मोरे यांनी अखंडितपणे मेहनत घेतली आहे. खंडोबाची भूमिका साकारणारे कलाकार देवदत्त नागे, सुरभी हांडे, प्राजक्ता गायकवाड यांनी देखील या देखाव्याला भेट देत याचे कौतुक केले आहे.
फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार शिंदे म्हणाले, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून हा उत्सव सुरु होतो. याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात. खंडोबा हे ज्यांचे कुलदैवत असते. अशांच्या घरी हे नवरात्र असते. त्याप्रमाणे आमच्या वाड्यात देखील हा उत्सव दरवर्षी साजरा होतो. आम्ही दरवर्षी विविध प्रकारचे देखावे साकारत असतो, यंदा हा मणी-मल्ल वधाचा साकारण्यात आला. तरी पुणेकरांनी हा देखावा नक्की पहावा, असे आवाहनही त्यांनी केले.
- फोटो ओळ : चंपाषष्ठी निमित्त कसबा पेठेतील वाड्यात मणी-मल्ल वधाचा देखावा साकारण्यात आला आहे. फडके हौद चौकाजवळील स्वरूपा फाऊंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष तुषार शिंदे यांनी वाड्यातील त्यांच्या घरामध्ये हा देखावा साकारला आहे.
