February 15, 2026

टिकाऊपणा जपत खाद्यसंस्कृतीत ठसा उमटवला : प्रा. मिलिंद जोशीसाधेपणातही उडुपीकर यांची अन्नब्रह्माची उपासना : प्रा. मिलिंद जोशीमराठमोळ्या चवीला आदरातिथ्याची जोड : प्रा. मिलिंद जोशीन्यू पूना बोर्डिंग हाऊसची शताब्दी : आडकर फौंडेशनतर्फे सुहास उडुपीकर यांचा सन्मान

0
IMG-20251107-WA0030
Spread the love

पुणे : व्यावसायिकतेच्या पलीकडे जात, ग्राहकांचे समाधान हीच पुंजी मानणाऱ्या न्यू पूना बोर्डिंग हाऊसच्या सुहास उडुपीकर यांनी दिखाऊपणाच्या मागे न लागता टिकाऊपणाला प्राधान्य देत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध लेखक, वक्ते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी काढले. काळाच्या ओघातील योग्य ती स्थित्यंतरे स्वीकारून, पण दर्जात कोणतीही तडजोड न करता, साधेपणाने उडुपीकर यांनी अन्नब्रह्माची उपासना सुरू ठेवली आहे, असेही प्रा. जोशी म्हणाले.

उत्कृष्ट खाद्यसेवा पुरविणाऱ्या न्यू पूना बोर्डिंग हाऊसला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून आडकर फौंडेशनतर्फे भोजनालयाचे संचालक सुहास उडुपीकर यांचा प्रा. जोशी यांच्या हस्ते आज (दि. ७) विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम झाला. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची विशेष उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर व्यासपीठावर उपस्थित होते. सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन उडुपीकर यांचा सन्मान करण्यात आला.
ग्राहकांशी वैयक्तिक नाते जपत, उडुपीकर यांनी तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून अन्नब्रह्म सेवेची शताब्दी पूर्ण केली आहे. मराठमोळी खाद्यसंस्कृती जपायला हवी, असे सांगून प्रा. जोशी म्हणाले, जागतिकीकरणानंतर एकूणच जागतिक जीवनशैलीत जे बदल झाले त्याचे परिणाम स्थानिक भाषा आणि संस्कृती यावरही झालेले आहेत. खाद्यसंस्कृतीही त्याला अपवाद नाही. अशा परिस्थितीत आणि स्पर्धेत आपली मराठमोळी खाद्य संस्कृती जपायला आणि टिकवायला हवी. शतकपूर्ती केलेल्या न्यू पूना बोर्डिंग हाऊसने ती जपली आहे. मराठमोळी चव ही न्यू पूना बोर्डिंग हाऊसची खासियत आहे. त्याला आदरातिथ्याची जोड मिळाल्याने गेले शतकभर ग्राहकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. मराठीपण ही संकल्पना खूप व्यापक आहे. त्यात खाद्यसंस्कृतीही अंतर्भूत आहे. मराठी माणसांची समाधानी वृत्ती हाच मराठी माणसांच्या व्यावसायिक प्रगतीतला सर्वात मोठा अडसर आहे. अन्य प्रांतातले खाद्यपदार्थ भारतभर मिळतात; मात्र महाराष्ट्रातले खाद्यपदार्थ महाराष्ट्र सोडून अपवादानेच इतर राज्यात मिळतात, हे चित्र बदलायला हवे त्यासाठी मराठी उद्योजकांनी पुढाकार घ्यायला हवा. खाद्य संस्कृतीशी निगडित उद्योगांना आजवर नेहमीच भरभराटीचे दिवस राहिले आहेत यापुढेही राहणार आहेत. फक्त उद्योजकांनी मोठ्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा ठेवून काम करायला हवे.

सचिन ईटकर म्हणाले, न्यू पूना बोर्डिंग हाऊसमधील भोजन हे उर्जा पुरवणारे केंद्र आहे. खाद्य पदार्थांच्या दर्जातील सातत्य आणि गुणवत्तेशिवाय संस्थेची शताब्दी शक्य नाही. त्यामुळे न्यू पूना बोर्डिंग हाऊसची शताब्दी हा उत्तम व्यावसायिक आदर्श आहे. समाधानी आणि आनंदी ग्राहक जपणारी ही अभिमानास्पद वाटचाल आहे.

सत्काराला उत्तर देताना सुहास उडुपीकर म्हणाले, व्यवसायाची सुरुवात, प्रारंभीचे अपरिमित कष्ट, प्रतिकूलतेशी झगडत केलेला संघर्ष, पहिल्या दोन पिढ्यांनी सोसला आणि मी तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. बोर्डिंगची शताब्दी हे स्वप्न होते, त्याची परिपूर्ती अनुभवताना कृतकृत्य झाल्याची भावना आहे. कुटुंबियांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हते. बोर्डिंगसाठी आपलेपणाने काम करणारे सर्व सहकारी, ही आमची एकत्रित टीम आहे. या सर्व वाटचालीत कुटुंबिय आणि सहकारी, पुरवठादार आणि ग्राहक यांचे एकत्रित श्रेय आहे.

प्रास्ताविक करताना प्रमोद आडकर म्हणाले, उडुपीकर यांच्या बोर्डिंगमध्ये कुणीही केवळ ग्राहक नसतो, ते सारे स्नेही असतात. शून्यापासून सुरुवात करून बोर्डिंगने शताब्दीचा टप्पा गाठला आहे, हे महत्त्वाचे आहे.

राजकुमार सुराणा यांनी मानपत्राचे वाचन केले. उडुपीकर यांच्या मातोश्री पद्मजाताई तसेच पत्नी सपना यांचा सत्कार मैथिली आडकर यांनी केला. वैजयंती आपटे यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‌‘आपण सारे खवय्ये‌’ या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. स्वप्नील पोरे, सुजित कदम, शोभा शेट्टीवार, मीना सातपुते, उज्ज्वला सहाणे, डॉ. रेवा देशमुख, राजश्री सोले, हेमंत केतकर, स्वाती दाढे, प्रतिभा पवार, मीनाक्षी नवले, प्रभा सोनवणे, प्रतिमा जोशी, शैलजा किंकर यांचा सहभाग होता. तनुजा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळ :
आडकर फौंडेशन आयोजित सत्कार समारंभात (डावीकडून) सचिन ईटकर, ॲड. प्रमोद आडकर, सुहास उडुपीकर, प्रा. मिलिंद जोशी, मैथिली आडकर.

प्रति,
मा. संपादक
न्यू पूना बोर्डिंग हाऊसला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आडकर फौंडेशनतर्फे भोजनालयाचे संचालक सुहास उडुपीकर यांचा आज (दि. ७) विशेष सन्मान करण्यात आला. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
ॲड. प्रमोद आडकर, अध्यक्ष, आडकर फौंडेशन
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 992290801

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी