February 15, 2026

मुक्ता बर्वे, प्रसाद कुलकर्णी यांना यंदाचा युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कारयाज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) वर्धापन दिन सोहळा ; माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती

0
IMG-20250929-WA0026
Spread the love


पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यांतर्गत वितरित होणारे सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार व स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार अनुक्रमे सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपेंद्र केळकर, सचिन पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संस्थेचे श्रीकांत जोशी, मंजुषा वैद्य, प्रतिभा संगमनेरकर, उपेंद्र केळकर, सचिन पंडित, अंजली दारव्हेकर, मिलिंद दारव्हेकर आदी उपस्थित होते.

टिळक स्मारक मंदिर येथे शनिवार, दिनांक ४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यावेळी संस्थेच्या युवा महिला अध्यक्ष व खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी या देखील उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी युवा कलाकार पुरस्कार स्वप्नील जोशी, मनोज जोशी, बेला शेंडे, संदीप खरे, संकर्षण क-हाडे, प्रसाद ओक आदींना देण्यात आला आहे.

पुरस्कार वितरण सोहळा, वर्धापन दिन कार्यक्रमासह ब्राह्मण उद्योजकांचे एकत्रीकरण हा देखील कार्यक्रमाचा उद्देश आहे. सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या युवा कार्यकारिणीने केले आहे. पुरस्कार वितरण समारंभानंतर पुरस्कारार्थींची प्रकट मुलाखत देखील होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही संस्था १९४० साली स्थापन करण्यात आली. युवा हा उपक्रम २००४ साली स्व. चंद्रकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील अधिवेशनात सुरु करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी