जगाचे पालनपोषण करते ती मातृदेवताडॉ. गो.बं. देगलूरकर ; श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सवात’ जागर विश्वजननीचा पुस्तक प्रकाशन आणि लेखिका व कवयित्री सन्मान सोहळा
पुणे : आपण कोणत्याही व्यवसायात आपण असलो, तरी विश्वजननीचा अभ्यास आपल्याला करता येईल. जगात अगदी प्रारंभी जननीचा मान राखला जात आहे. पहिल्यांदा ज्या देव-देवता आपल्या आयुष्यात आल्या. त्यात मातृदेवता ही पहिली आहे. मातृदेवतेचे महत्व अत्यंत पूर्वीपासून असून पूजा होत आली आहे. जगाचे पालनपोषण करणारी मातृदेवता असते, असे मत मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात ‘जागर विश्वजननीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि लेखिका व कवयित्री सन्मान सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला. यावेळी प्रख्यात लेखिका डॉ.मंजिरी भालेराव, पुस्तकाच्या लेखिका डॉ. कल्याणी हर्डीकर, मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, विश्वकर्मा प्रकाशनाचे सीईओ विशाल सोनी, संपादक संदीप तापकीर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. मंजिरी भालेराव, डॉ. लता अकलुजकर, डॉ. ज्योती गोगटे, ॲड. वैशाली भागवत, ॲड. विभावरी बिडवे, किरण भट, डॉ. श्रद्धा साही, कल्याणी सरदेसाई, दीपाली दातार या ९ लेखिका व कवयित्री यांचा सन्मान अमिता अग्रवाल व डॉ. तृप्ती अग्रवाल यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
डॉ.मंजिरी भालेराव म्हणाल्या, स्त्री शक्तीची उपासना कोठे कोठे होत होती, हे पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतात शक्तीची उपासना किती जुनी आहे, असा विचार केला तर आपल्या वेद काळ असे वाटते. मात्र, वैदिक काळाच्या आधी अश्मयुगात भारतात सुरु झाली असावी, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. विविध काळात ही सृजन व समृद्धीची उपासना पाहायला मिळते.
डॉ. कल्याणी हर्डीकर म्हणाल्या, मराठी शिक्षकी पेशामध्ये असताना महाराष्ट्रातील बंडखोर संत कवयित्री माझ्या समोर आल्या. आधुनिक युगात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकविले पाहिजे, त्यांनी त्या वाचल्या पाहिजेत, याचा विचार केला. स्त्री शक्ती हा विचार करताना, आपल्या समाजातील नातेसंबंध आहेत, हे सगळे आपल्यापर्यंत पाझरत आले आहेत. आज आधुनिक युगात आपल्याकडे स्त्री शक्तीचा जागर होत आहे, याला कुटुंब व्यवस्था कारणीभूत आहे. स्त्री अत्याचार कमी करण्यास मातृशक्तीचा जागर व्हायला हवा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल सोनी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी पोंक्षे, तर आभार प्रदर्शन संदीप तापकीर यांनी केले.
- फोटो ओळ : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात ‘जागर विश्वजननीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि लेखिका व कवयित्री सन्मान सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवर.
