बाजीरावांचे घोडदळ वापरण्याचे युद्धकौशल्य जगाच्या इतिहासातील उत्कृष्ट उदाहरणइतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे मतः अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंतीनिमित्त ‘बाजीराव द ग्रेट!’ या विजय पानवलकर लिखित ऐतिहासिक ग्रंथाचे प्रकाशन
पुणे ः जगाच्या इतिहासात एकही लढाई न हरलेले योद्धा म्हणून बाजीराव पेशवे यांना ओळखले जाते. घोडदळाचा सर्वश्रेष्ठ सेनानी म्हणजे बाजीराव पेशवे असे वर्णन इंग्रज इतिहासकारांनी केलेले आहे. इंग्रज फिल्ड मार्शल मॉन्टगोमेरी यांनी अ कन्साईज हिस्टरी ऑफ वाॅरफेअर या ग्रंथात जगातील पहिल्या दहा युद्धात पालखेडच्या लढाईचा उल्लेख केला आहे. पालखेडच्या युद्धाला रणनीतिक शास्त्रातील क्लासिक धडा म्हटले आहे. आणि बाजीरावांचे घोडदळ वापरण्याचे कौशल्य जगाच्या इतिहासातील उत्कृष्ट उदाहरण ठरवले आहे, असे मत इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी व्यक्त केले.
ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या वतीने अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंतीनिमित्त ‘बाजीराव द ग्रेट!’ या विजय पानवलकर लिखित ऐतिहासिक ग्रंथाचे प्रकाशन सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या सभागृहात झाले. यावेळी व्यासपीठावर लेखक विजय पानवलकर, अमृता कुलकर्णी , वर्षा पुराणिक उपस्थित होते. यावेळी जगन्नाथ लडकत यांनी अजिंक्य योद्धा बाजीराव कसे होते, त्यांची शौर्यगाथा आणि पालखेडची लढाई या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. मिहाना पब्लिकेशनच्या वतीने पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
जगन्नाथ लडकत म्हणाले, बाजीरावांनी निजामाला थेट भिडून न हरवता, त्याच्या सैन्याला पाण्यापासून व अन्नधान्य पुरवठ्यापासून तोडून टाकले. वेढा घालून निजामाला शरण यायला भाग पाडले. हे युद्ध आजही क्लासिक घोडदळ युद्ध म्हणून जगभर प्रसिद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
विजय पानवलकर म्हणाले, बाजीराव पेशवे हे जगाच्या इतिहासातील ग्रेट नाव आहे. अलेक्झांडर, जगविजेता नेपोलियन यांच्या तोडीचे होते. ब्रिटिशांनी देखील पालखेडच्या लढाईचे उदाहरण इतिहासात सर्वोत्कृष्ट लढाई म्हणून केले आहे. आजच्या तरुणांना केवळ त्यांचा पाठ्यपुस्तकातील इतिहास माहिती आहे. त्याव्यतिरिक्त त्यांचे शौर्य कळावे, अशी अनेक उदाहरणे पुस्तकात नमूद केली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
फोटो ओळ – अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंतीनिमित्त ‘बाजीराव द ग्रेट!’ या विजय पानवलकर लिखित ऐतिहासिक ग्रंथाचे प्रकाशन सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या सभागृहात झाले.
