श्री ओंकारेश्वर चरणी ११ ध्वजपथकांची मानवंदना सोमवारी (दि.१८)
श्री ओंकारेश्वर मंदिर देवस्थान च्यावतीने आयोजन ; चंद्रकांत पाटील, हेमंत रासने यांची उपस्थिती
पुणे : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी, दि.१८ ऑगस्ट रोजी शनिवार पेठेतील श्री ओंकारेश्वर मंदिर देवस्थान च्या वतीने ओंकारेश्वर चरणी ११ ध्वजपथकांची मानवंदना हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने सायंकाळी ६.३० वाजता समर्थ प्रतिष्ठानचे स्थिरवादन होणार असून त्यानंतर रात्री ८ वाजता महाआरती होणार आहे, अशी माहिती मंदिराचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर आणि गौरव बापट यांनी दिली.
कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मानवंदना देण्याकरिता सहभागी ११ पथकांमध्ये रमणबाग, शिवगर्जना, ज्ञानप्रबोधिनी, श्रीराम, स्वरूपवर्धिनी, नादब्रह्म, युवा, अभेद्य, गरवारे, शिवमुद्रा, गजलक्ष्मी या पथकांचा समावेश आहे.
मुठा नदीच्या किनारी उभारलेले, नऊ घुमटांनी सजलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीचे सुंदर दर्शन घडवणारे पुण्याचे पेशवेकालीन श्री ओंकारेश्वर मंदिर शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक आहे. त्यामुळे यंदा शेवटच्या श्रावणी सोमवारी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले आहे.
