February 15, 2026

मंडईतील म्हसोबाराया श्रीकृष्णाच्या वृंदावनातील पुष्पप्रतिकृतीमध्ये विराजमानअखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव ; धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ

0
IMG-20250722-WA0051
Spread the love


पुणे : शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या निमित्ताने म्हसोबा मंदिरात विविधरंगी फुलांनी साकारलेल्या २५ फूट उंचीच्या भगवान श्रीकृष्णाच्या वृंदावनातील आकर्षक पुष्पसजावटीमध्ये म्हसोबाराया विराजमान झाले आहेत. प्रारंभी श्रीं चा रुद्राभिषेक व रुद्रयाग, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाला थाटात प्रारंभ झाला.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी सलोनी व अमर सोनावणे, नीता व विनायक गायकवाड यांच्या हस्ते श्रीं चा रुद्राभिषेक व रुद्रयाग पार पडले. तर, दुपारी भिंताडे उद्योग समूहाच्या शालन भिंताडे, पृथ्वी भिंताडे यांच्या हस्ते श्रीं ची महाआरती झाली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, पूजा जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मंडई म्हसोबा मंदिराच्या परिसरात पुष्पसजावटीसोबतच विविधरंगी विद्युतरोषणाई देखील करण्यात आली असून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या २५ फूट उंचीच्या भगवान श्रीकृष्णाच्या वृंदावनातील पुष्पप्रतिकृतीसोबतच बासरीची भव्य पुष्पप्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे. याकरिता शेवंती, झेंडू, गुलाब यांसह अनेक फुले वापरण्यात आली आहेत. सुभाष सरपाले यांच्या मार्गदर्शनाखाली कारागिरांनी ही आरास साकारली आहे. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे या उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.

धार्मिक उत्सवासोबतच विधायक उपक्रम हे उत्सवाचे वैशिष्टय आहे. त्यामध्ये वंचित विशेष मुलांना आर्थिक निधी प्रदान, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य प्रदान करण्याचा उपक्रम तसेच समाजातील विविध संस्थांना आर्थिक मदत देखील देण्यात येणार आहे. दीप अमावस्येनिमित्त दीप पूजन व दीपोत्सव करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने होणार आहे.

उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा, सकाळी रुद्राभिषेक व रुद्रयाग आणि दुपारी शहर व जिल्ह्यातील भजनी मंडळाची सेवा तसेच ढोल ताशा वादन देखील होणार आहे. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

  • फोटो ओळ : शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या प्रारंभी श्रीं चा रुद्राभिषेक व रुद्रयाग पार पडले. तसेच मंदिराला करण्यात आलेली भगवान श्रीकृष्णाच्या वृंदावनाची २५ फूट आकर्षक पुष्पप्रतिकृती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी