February 15, 2026

निर्बंध आणि भयमुक्त होणार यंदाचा गणेशोत्सवपुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ; राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पुणे विभाग पारितोषिक वितरण समारंभ

0
IMG-20250720-WA0029
Spread the love


पुणे : यंदा गणपती उत्सव हा राज्य उत्सव असा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी उत्सव अधिक वाढेल, त्याकरिता सर्व उपाययोजना सुरु झाल्या आहेत. तसेच त्याविषयी बैठका देखील आता सुरु होतील. यंदाचा गणपती उत्सव निर्बंध व भयमुक्त मुक्त राहिल. पोलीस व प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत. मागील वर्षीची परवानगी चालले. यावर्षी परवानगीची वेगळी गरज नाही, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. पारितोषिक वितरण समारंभाला पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जगद्गुरु कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भोसले मार्ग भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, एरंडवण्यातील श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील पोटसुळ्या मारुती मंडळाने तृतीय, नवी खडकी येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ ट्रस्टने चौथे तर भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेत सहभागी झालेल्या १९४ मंडळे व शाळांपैकी १०६ मंडळे व शाळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १४ लाख ९५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५) साजरे करणारे मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

अमितेश कुमार म्हणाले, महाराष्ट्रात ३० वर्षांपासून वेगवगेळ्या शहरात उत्सवात मी बंदोबस्त केला होता. मागील वर्षी पहिल्यांदाच पुण्यात नियोजन केले. पुण्याच्या उत्सवाचे स्वरूप विशाल आहे. सामान्य नागरिक यामध्ये सहभाग घेतात. त्यामुळे यंदाचा बंदोबस्त हा सोयी-सुविधांनी युक्त असणार आहे. जो शांतता सुव्यवस्था बाधित करेल, त्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. प्रशासन उत्सवामध्ये अडथळा निर्माण करेल, असे होणार नाही. वाहतूक नियोजन चांगले करता येईल, असे पाहू. मेट्रोचा वापर गणेशभक्त मोठ्या प्रमाणात करतील. यामुळे विविध ठिकाणी गणेशाचे दर्शन चांगले होईल.

डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर म्हणाले, ट्रस्टतर्फे आरोग्य, समाज, शिक्षण, अध्यात्म, विज्ञान, निर्सगात काम केले जात आहे. देशाला दिशा देणारी गणेशोत्सव मंडळे ही महाराष्ट्रात असून ती मोठ्या संख्येने पुण्यात पाहायला मिळतील. बाप्पाला जेव्हा आपण निरोप देतो, तेव्हा डीजे आणि गाणी कशासाठी हवी. मिरवणुकीत बाप्पा शेवटी असतो आणि आपण सर्वात पुढे. मिरवणुकीत व्यसने, कचरा, थिल्लर गाण्यांवर नाच हे बाप्पाला कसे आवडेल? शेवटच्या निरोपाला विकृत वळण लागणे हे चुकीचे आहे. वारी, शिवजयंती आणि गणेशोत्सव ही महाराष्ट्राची स्पंदने आहेत.

अण्णा थोरात म्हणाले, यंदा अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ च्या आत विसर्जन मिरवणूक संपवायला हवी. त्यामुळे यंदा मिरवणूक सकाळी १०.३० च्या ऐवजी दोन तास आधी सुरु व्हावी. आपण धार्मिक उत्सव साजरा करतो, त्यामुळे याबाबत विचार व्हायला हवा. दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत चालणारी मिरवणूक लवकर संपविणे गरजेचे आहे. यंदाच्या वर्षी अनंत चतुदर्शीला लवकर म्हणजेच दोन तास आधी मिरवणुकीत निघावे.

उल्हास पवार म्हणाले, संघटन आणि प्रबोधनानंतर जनआंदोलन उभे राहावे, ही गणेशोत्सवामागील लोकमान्यांची भूमिका होती. डीजे म्हणजे गणपती नाही. फार मोठा आवाज म्हणजे गणेशोत्सव नाही. आज उत्सवाचे रूप बदलले, तरी देखील १०० वर्षांपूर्वीचे बँड हे गणपतीपुढे असायचे. दगडूशेठ बाप्पा हा श्रद्धेचा बाप्पा आहे. महापुरुषांची जयन्ती साजरी करणे, म्हणजे नाचणे असे नाही. हे महापुरुष व्यसनाच्या विरोधी होते, त्यांचा मिरवणुकीत आपण अपमान करता कामा नये.

अंकुश काकडे म्हणाले, डीजेचा वापर आपण करता कामा नये. डीजे नको, ढोल लेझीम, वारकरी पथक लावा, हा निर्णय २०-२५ वर्षांपूर्वी दगडूशेठ गणपती मंडळाने घेतला. लोकांना त्रास होऊ नये, याकरिता त्यावेळच्या विश्वस्तांची दूरदृष्टी होती. गणेशोत्सव हा उत्साहात साजरा व्हायला हवा. डीजे शक्यतो लावू नका. अगदीच देखाव्याचा भाग असेल, तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. यंदा मंडळांसोबत स्पर्धेत असलेला शाळांचा सहभाग मोठा असून तो महत्वाचा आहे.

श्रीकांत शेटे म्हणाले, गणपतीचा उत्सव सामाजिक, धार्मिक व प्रबोधनपर करायला हवा. उत्सवात जल्लोष हवा पण त्याचा हौदोस व्हायला नको. विरोध डीजे च्या आवाजाला नाही, तर अश्लीलपणे नाच करण्याला आहे. आपण त्याला विरोध करायला हवा. उत्सव ग्लोबल पद्धतीने साजरा करायचा आहे, पण त्यामध्ये प्रबोधनात्मक विचार मांडायला हवा.

ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, उत्सवाने समाजाला काय दिले हे पाहणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक उपेक्षित गोष्टींना आधार देणारा हा उत्सव आहे. नक्षलवादी भागात काम करणारा, दररोज विधायक कार्यक्रम करणारा कार्यकर्ता गणेशोत्सवाने घडविला. हा उत्सव २० वर्षांपूर्वी निर्बंधमुक्त होता, तो पुन्हा तसा करण्याकरिता कार्यकर्ते सोबत आहेत. त्यामुळे उत्सव निर्बंधमुक्त रहायला हवा. दारू पिऊन विघ्न आणणाऱ्याला पोलिसांनी सोडू नये. मात्र, समाजाकरिता कार्य करणारा उत्सव २४ तास सुरु रहायला हवा. यंदा हा राज्य उत्सव दिमाखात साजरा करू, असेही त्यांनी सांगितले. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

  • फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. स्पर्धेत भोसले मार्ग भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी उपस्थित विजेता संघ आणि मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी