व्यवस्थापन पदवीधरांनी ‘कर्तव्यनिष्ठ नागरिक’ आणि ‘आत्मनिर्भर भारता’चे राष्ट्रनिर्माते व्हावे: राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांचे प्रतिपादन
- ‘पीआयबीएम’चा १५वा दीक्षांत समारंभ उत्साह
“व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल्या पदवीधरांनी ‘कर्तव्यनिष्ठ नागरिक’ म्हणून आपली भूमिका स्वीकारण्याचे आणि ‘आत्मनिर्भर भारता’च्या दृष्टिकोनासाठी राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान द्यावे. त्यांच्या पदवीचे खरे मूल्य केवळ वैयक्तिक यशामध्ये नाही, तर इतरांप्रती संवेदनशीलता बाळगण्यात आणि कठीण प्रसंगी इतरांना मदत करण्याच्या इच्छेमध्ये आहे,” असे प्रतिपादन झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी केले.
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचा अर्थात पीआयबीएमचा १५ वा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. पिरंगुट येथील ‘पीआयबीएम’च्या कॅम्पसमध्ये आयोजित समारंभासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राज्यसभा खासदार रेखा शर्मा, टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष अरविंद गोयल, रिलायन्स जिओमार्टचे सीईओ संदीप वर्गीती, टाटा मोटर्स फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक नीरज धवन, ‘पीआयबीएम’चे संस्थापक अध्यक्ष रमनप्रीत यांच्यासह विविध क्षेत्रांतील नामवंत पाहुण्यांची विशेष उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. एस. के. जैन, टाटा प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक विनायक पै, स्टेट स्ट्रीटचे कार्यकारी उपाध्यक्ष अरिंदम बॅनर्जी, माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
संतोष कुमार गंगवार म्हणाले, “विद्यार्थ्यांनी स्पष्ट विचार करून असे निर्णय घ्यावेत, ज्यामुळे इतरांवर सकारात्मक प्रभाव पडेल. विद्यार्थ्यांचे वैयक्तिक सामर्थ्य राष्ट्राचे भविष्य घडवणारे आहे. ‘पीआयबीएम’च्या मजबूत कॉर्पोरेट संबंधांचे कौतुक वाटत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’चे स्वप्न साकार होण्यासाठी हे प्रयत्न उपयुक्त थरातील. केवळ वैयक्तिक यशावर लक्ष केंद्रित न करता, राष्ट्राच्या भविष्याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा.”
रमनप्रीत यांनी मान्यवर आणि पदवीधर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. २००७ मध्ये स्थापनेपासूनच्या ‘पीआयबीएम’च्या प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकत, शैक्षणिक आणि कॉर्पोरेट जगतातील अंतर कमी करून भविष्यातील सक्षम नेते घडवण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. लवकरच पीआयबीएम ‘स्किल युनिव्हर्सिटी’ म्हणून विकसित होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करत संस्थेला जागतिक दर्जाची युनिव्हर्सिटी बनवण्यासाठी अथक परिश्रम करत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना ‘मोठे विचार करून मोठे यश मिळवा’ असा सल्लाही त्यांनी दिला, तसेच केवळ ‘तीन टक्के विद्यार्थी’ जे दूरदृष्टी बाळगतात आणि इतरांना मार्गदर्शन करतात, त्यांच्यापैकी एक होण्याचे आवाहन केले. धोका पत्करण्याची क्षमता आणि आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणे यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगून, त्यांनी पदवीधरांना शुभेच्छा दिल्या. अरविंद गोयल, रेखा शर्मा यांनीही मार्गदर्शन केले.
