February 16, 2026

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यासपंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरवडॉ. श्याम गुंडावार, पंडित कैवल्यकुमार गुरव यांची रंगली मैफल

0
IMG-20250623-WA0057
Spread the love

पुणे : शास्त्रीय संगीत हे बंदिस्त संगीत असून ते छोटेखानी मैफलीतून अधिक खुलत जाते. छोट्या मैफली म्हणजे रसिक आणि गायक यांना जोडून ठेवणारा धागा आहेत. छोटेखानी मैफलीतून गाण्याचा आनंद किती मिळतो हे महत्त्वाचे आहे. रसिकांची दाद ही कलाकारांना सुखावते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांनी केले.

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठान व बेडेकर गणपती मंदिर कोथरूड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित प्रभुदेव सरदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त रविवारी बेडेकर गणपती मंदिर, कोथरूड येथे हा संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. विकास कशाळकर, गोविंदराव बेडेकर, शिला देशपांडे, पतंजली मादुस्कर, विदुषी शोभा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी पंडित सुहास व्यास बोलत होते. डॉ. अविनाश जोशी, डॉ. ललित कोसे, आसावरी पद्मवार, मुकुंद दळवी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. कर्नल कल्याणी देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.

निवृत्तीनंतर विदर्भातून पुण्यात आल्यानंतर डॉ. विकास कशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित सुहास व्यास यांच्या सहकार्याने ‘पंचामृत’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून सांगीतिक समारोह, चर्चासत्र, मैफिलींचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. श्याम गुंडावार यांनी प्रास्ताविकात सांगितली.
पंडित प्रभुदेव यांच्याविषयी आठवणी सांगताना पतंजली मादुस्कर म्हणाले, १९६९ मध्ये त्यांनी सादर केलेला कलावती राग आजही कानात घुमतो. एकदा त्यांचे भजन ऐकून त्याचे नोटेशन लिहून पोस्टकार्ड पाठवले आणि त्यांचे उत्तर आले ‘भेटून शिकवतो’. अशी श्रोता म्हणून ओळख झाली. काम आणि गाणे हे एकत्र करता येते हे त्यांच्याकडे पाहून आम्ही शिकलो.
शास्त्रीय संगीताच्या छोट्या मैफिली व्हायला हव्यात. दाद देणारे कमी झालेत. पण रसिक अजूनही आहेत. अशा मैफिलीत गाणाऱ्याचा कस लागतो, असे डॉ. विकास कशाळकर मनोगतात म्हणाले.

गाणे शांतता मिळावी यासाठी असते; पण ते सादर करताना बेचैनीच अधिक देते. गाण्यासाठी अजून काय करता येईल याचा विचार शांत बसू देत नाही. त्याचे उत्तर पंचामृत या संस्थेच्या स्वरमंचावर मिळते, असे विदुषी शोभा चौधरी कौतुकाने म्हणाल्या.

सत्कार सोहळ्यानंतर डॉ. श्याम गुंडावार आणि पंडित कैवल्यकुमार गुरव यांची मैफिल रंगली. मैफलीची सुरुवात डॉ. श्याम गुंडावार यांच्या गायनाने झाली. सुरुवातीस त्यांनी शामकल्याण रागातील आणि झपतालातील ‘जाने दे री मोहे, श्यामसुंदर’ ही बंदिश सादर केली. तीनतालातील ‘पायल मोरी बाजेरे सजना’, एकतालातील ‘बेला सांज की सुखद सुहावनो’ या बंदिशी सादर केल्या. मैफलीची सांगता माधान गावचे संत गुलाबराव यांच्या ‘हरी हरी पुंडलीक वरदा’ या अभंगाने केली.
प्रसिद्ध गायक पंडील कैवल्य कुमार गुरव यांची मैफल रंगली. त्यांनी भिन्न षड्ज रागातील ‘बलमा लागी तोरी प्रीत’, ‘उड जा रे कागा’, ‘आयोरी बसंत’ या बंदिशी सादर केल्या. त्यानंतर गौड मल्हार रागातील ‘काहे हो पिहरवा आजाहून आये’ आणि ‘फारके मोरी बनिया’ या पारंपारिक बंदिशीचे सादरीकरण केले. ‘विठ्ठल विठ्ठल नामाचीये गजरी, आली वारी पंढरीशी’ या अभंगानंतर ‘अली देखो भोर भई‘ या भैरवीने मैफलीची सांगता केली. अगदी सहज आलाप आणि ताना घेत संपूर्ण सप्तकात फिरत राहिलेले स्वर रसिकांना भावले.
आदित्य जोशी, प्रसाद कुलकर्णी (सहगायन), स्वरूप दिवाण (संवादिनी), प्रणव गुरव (तबला), अबोली सेवेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
कार्यकमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मकरंद वळे यांनी केले.
फोटो : दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‌घाटन करताना मान्यवर.
फोटो : पंडित सुहास व्यास यांचे स्वागत करतना डॉ. श्याम गुंडावार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी