February 15, 2026

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेखशंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत सत्का

0
IMG-20250621-WA0118
Spread the love

पुणे : व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड दिल्याशिवाय व्याकरण समजणार नाही; विद्यार्थ्यांना व्याकरणाची गोडी लागणार नाही, असे मत सुप्रसिद्ध व्याकरणतज्ज्ञ आणि मराठी भाषा, साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रा. यास्मिन शेख यांनी व्यक्त केले.
प्रा. यास्मिन शेख यांनी आज (दि. 21) वयाची शंभरी पार केली. त्या निमित्त प्रा. शेख यांच्या कन्या रूमा बावीस्कर, दिलीप फलटणकर आणि अंर्तनादचे भानू काळे यांनी त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. त्या वेळी प्रा. शेख सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या. सेनापती बापट रस्त्यावरील महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या कार्यालयात सुहृदांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा झाला.
101व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या प्रा. यास्मिन शेख यांनी आयुष्याचा 100 वर्षांचा पट उलगडून दाखविला. आपल्या वयाच्या 9व्या वर्षी आईचे झालेले निधन, दुसरे लग्न न करता वडिलांनी सात भावंडांचा केलेला सांभाळ, शालेय वयात आलेल्या कडू-गोड आठवणी, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मिळालेल्या संधीचे केलेले सोने याविषयी त्या भरभरून बोलल्या. लहानपणीच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, धर्माने ज्यू असूनही घरात मराठी भाषेतील मुबलक पुस्तके होती. त्यामुळे मराठी भाषेतील साहित्य वाचनाची गोडी लागली. महाविद्यालयीन आयुष्यात माटे, वाटवे यांच्यासारखे शिक्षक मिळाल्याने मराठी भाषा, व्याकरणाची गोडी वाढतच गेली. मराठीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक कधी सोडला नाही.
मुस्लिम मुलाशी विवाह करण्यास वडिलांचा विरोध होता, पण विवाहासाठी सासरच्या लोकांनी पुढाकार घेतला. लग्न झाल्यानंतर आपल्या दोन्ही मुलींचे त्यांनी खूप लाड केले. त्यांना एकदा कडकडून मिठी मारल्यानंतर त्यांचा माझ्यावरील राग गेला. आदर्श पिता म्हणजे काय याचा अनुभव घेतला असल्याने आपल्या आयुष्यातील वडिलांचे स्थान खूप मोठे आहे, असेही त्या म्हणाल्या. वडिल आणि दोन्ही मुलींच्या मिळालेल्या सहकार्यामुळे कृतज्ञ असल्याची भावना प्रा. शेख यांनी व्यक्त केली.
प्रा. यास्मिन शेख यांचा गौरव करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, देहू, आळंदीहून ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने जात असताना महाराष्ट्राची साहित्य पंढरी असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एक प्रतिनिधी या नात्याने या व्याकरणयोगिनीचा माझ्या हस्ते झालेला सत्कार मला वारीचे पुण्य देणारा आहे. मराठी भाषेच्या उत्कर्षाची आस बाळगून आणि व्याकरणाचा ध्यास घेऊन त्यांनी जे काम केले आहे ते पुढच्या अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरणार आहे. वर्ग आणि अध्यापन एवढ्यापुरते आपले काम मर्यादित न ठेवता त्यांनी आपल्या कामातून समाजाला भाषाभान दिले. व्याकरणासारखा रुक्ष आणि क्लिष्ट वाटणारा विषय त्यांनी ललितरम्य पद्धतीने सर्वांना शिकवला. शतकपूर्ती केलेली ही विदुषी मराठीचे वैभव आहे.
प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, मराठी भाषा, शिक्षणाचा दर्जा खालावत असताना तेथे गुणवत्ता वाढीसाठी प्रचंड प्रयत्न करण्याची गरज असताना त्याकडे लक्ष न देता तिसरी भाषा अनिवार्य केली तर विद्यार्थी तिन्ही भाषांमध्ये मागे पडण्याची भीती वाटते. आज महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणात हिंदीकरण होत आहे. हिंदी सक्तीला आमचा विरोध सांस्कृतिक कारणास्तव आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद पहिलीपासून हिंदी वा अन्य भारतीय भाषांची सक्ती करून शासनाने हिरावून घेतला आहे.
कार्यक्रमाविषयी माहिती भानू काळे यांनी दिली तर प्रास्ताविक दिलीप फलटणकर यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा काळे यांनी केले.

फाटो ओळ : प्रा. यास्मिन शेख यांचा सत्कार करताना प्रा. मिलिंद जोशी. समवेत रूमा बावीस्कर, वर्षा काळे, दिलीप फलटणकर, भानू काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी