February 15, 2026

अंतरिच्या यातनांना अमरता द्याया इथे, शायरी ताज मी ही निर्मिला आहे इथे’

0
IMG-20250621-WA0063
Spread the love


‘शब्दही या पौरुषाचा बोललो नाही कधी, जगलो चुपचाप जैसा जन्मलो नाही कधी’
स्मरण – जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर कार्यक्रमास पुणेकर रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘दोस्तहो मैफिल आपली रंगण्या जर का हवी, आम्हा नको सौजन्य तुमची नुसती जिंदादिली हवी’; ‘तो प्रभू सर्वांतरात्मा आज मज श्रोता हवा, सांगतो त्याच्या मुखीही, ऐसीच घेऊ वाहवा’; ‘वृद्ध मी नाही जरी, निवृत्त झालो फारसा, सोडल्या मी दोन गोष्टी कंगवा आणि आरसा’; ‘वाटे धरू सन्मार्ग आता काळ थोडा राहिला, वाटे कशाला व्यर्थ आता काळ थोडा राहिला’ अशी भावपूर्ण मांडणी करणाऱ्या आणि मराठीतील आद्य शायर समजल्या जाणाऱ्या भाऊसाहेब पाटणकर यांच्या एकापेक्षा एक सरस रचनांच्या मैफलीने रसिकांची सायंकाळ रंगारंग झाली.
निमित्त होते कायझेन मीडिया आणि मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या शायरीवर आधारित ‘स्मरण – जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर’ या विशेष कार्यक्रमाचे.
कार्यक्रम सदाशिव पेठेतील भारतीय विचार साधना सभागृहात (भावे शाळा परिसर) शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. अपर्णा जोग, शिल्पा देशपांडे, सुनीता कुलकर्णी यांनी सादरीकरण केले तर संहिता लेखन अपर्णा जोग यांचे होते. अध्यक्षस्थानी रंगत-संगत आणि आडकर फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. सिने दिग्दर्शक, अभिनेते तसेच भाऊसाहेब पाटणकर यांचे नातजावई किरण यज्ञोपवीत, मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष विनायक माने यांची प्रमुख उपस्थिती होती. मनोरम को-ऑप बँक लि. सोमवार पेठ पुणे शाखेच्या व्यवस्थापक नेहा कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
‘शब्दही या पौरुषाचा बोललो नाही कधी, जगलो चुपचाप जैसा जन्मलो नाही कधी’; ‘चांदणे नुसतेच होते जीवनी या पसरले, वाटले दुर्दैव जैसे साफ मजला विसरले’; ‘वाटे धरू सन्मार्ग आता काळ थोडा राहिला, वाटे कशाला व्यर्थ आता काळ थोडा राहिला’; ‘सांगूच का या साहित्यिकांना काय या नक्की हवे, नुसते नको साहित्य यांना काहीतरी जास्ती हवे’; ‘अंतरिच्या यातनांना अमरता द्याया इथे, शायरी ताज मी ही निर्मिला आहे इथे’; अशा भाऊसाहेब पाटणकर यांच्या शायरीतून त्यांच्या विविधांगी विषयांना स्पर्श करणाऱ्या, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मिश्किल स्वभाव दर्शविणाऱ्या रचनांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
भाऊसाहेब पाटणकर यांच्या आठवणींना उजाळा देताना किरण यज्ञोपवीत म्हणाले, शायरीची नजाकत भावल्याने भाऊसाहेब शायरीकडे वळले. जीवनाचे चिंतन, अभ्यास, हजरजबाबीपणा त्यांच्या शायरीत पदोपदी जाणवतो. जी दिलेरी त्यांच्या स्वभावात होती तिच त्यांच्या काव्यात उतरली आहे. भाऊसाहेबांच्या शायरीची काव्यधारा खंडित होऊ नये याकरिता त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर केलेल्या कार्यक्रमातून त्यांच्या दिलेरीचा प्रवास खळाळत ठेवला गेला आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, भाऊसाहेब पाटणकरांच्या शेरोशायरीच्या मी प्रेमात पडलो होतो. म्हणूनच यवतमाळ येथे जाऊन त्यांचा सत्कार केला. यातूनच आमचे सूर जुळले व स्नेहबंध वाढत गेला. उर्दू भाषेपेक्षा आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत शायरी करणारे भाऊसाहेब पाटणकर यांची शेरोशायरी अशा कार्यक्रमांतून दूरवर पोहोचावी. भाऊसाहेबांनी रचलेली मराठीतील शेरोशायरी हे या भाषेचेच भाग्य आहे.
फोटो : कायझेन मीडिया आणि मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात सुनीता कुलकर्णी, शिल्पा देशपांडे, अपर्णा जोग.
फोटो : कायझेन मीडिया आणि मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात बोलताना ॲड. प्रमोद आडकर. समवेत किरण यज्ञोपवीत, विनायक माने.
प्रति,
मा. संपादक
कायझेन मीडिया आणि मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या शायरीवर आधारित मस्मरण – जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर या कार्यक्रमाच्या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
शिल्पा देशपांडे, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस (मो. 9922907801)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी