February 15, 2026

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद

0
IMG-20250619-WA0024
Spread the love

  • उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना; वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ
  • ‘सिंबायोसिस’ व सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टतर्फे रौप्य महोत्सवी उपक्रमाचे आयोजन

पुणे: “गेल्या २५ वर्षांपासून ज्ञानोबा-तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरविण्याचे सत्कर्म पुण्याचे काम आहे. टाळ-मृदूंगाच्या नादात, विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. अथक परिश्रम घेऊन निःस्वार्थ मनोभावे वारकऱ्यांची सेवा करणारे सर्वजण पंढरीचे ‘वारीवीर’च आहेत,” अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी झाला. यंदा या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून, १० सुसज्ज मोठ्या अँब्युलंस, पाच दुचाकी अँब्युलंस व ३०० हुन अधिक डॉक्टर्स, नर्स आणि स्वयंसेवकांची टीम देहभान हरपून काम करणार आहे. वेदनाशामक गोळ्या, औषधे, प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्यसेवा व आपत्कालीन सेवा पुरवली जाते. पुण्यापासून जेजुरी पर्यंत हा फिरता दवाखाना कार्यरत असेल.

सेनापती बापट रस्त्यावरील ‘सिंबायोसिस’च्या आवारात झालेल्या या कार्यक्रमावेळी ‘सिंबायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई, ‘सिंबायोसिस’च्या विश्वस्त संजीवनी मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी विरोधी पक्षनेते ऍड. अविनाश साळवे, पुणे महानगर पालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. रमण, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, अतुल साळवे, अक्षय साळवे, आकाश साळवे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “सलग २५ वर्षे अविरतपणे सुरू असलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे. वारकर्‍यांच्या सेवेत विठ्ठल-रुक्मिणीचा आशिर्वाद असतो. स्वयंशिस्त असलेल्या या वारी सोहळ्यात सेवेची संधी ईश्वरभक्ती असते. पालखी सोहळ्यात विविध स्वरूपात सेवा देणाऱ्या संस्थांची संख्या मोठी आहे. पंढरीच्या दिशेने चालताना त्यांची सेवा करण्याची संधी हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. “

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “एका अँब्युलन्सपासून सुरु झालेला हा प्रवास १० पेक्षा अधिक अँब्युलन्सवर गेला आहे. हा फिरता दवाखाना वारकऱ्यांचा शीण उतरण्याचे काम करतो. हा उपक्रम वारी असेल, तोवर अविरतपणे सुरु राहील. राज्यभरातून वारकरी आळंदी व देहूमध्ये दाखल झाले आहेत. परदेशातून, परप्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांना हा अनुभव समृद्ध करणारा असतो.”

“वारकऱ्यांच्या सेवेचा हा उपक्रम २००१ मध्ये एका अँब्युलंसपासून सुरु झाला. पांडुरंगाच्या आशीर्वादाने २५ वर्षे सातत्याने लाखो वारकऱ्यांवर उपचार करता आले. ही वारकरी आरोग्यसेवा अव्याहतपणे सुरु राहील, असा विश्वास देतो,” असे ऍड. अविनाश साळवे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी