February 15, 2026

सामाजिक उपक्रमांनी ‘नादब्रह्म’ चे वाद्यपूजन व सरावाचा श्रीगणेशानादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक (ट्रस्ट) पुणे ; पथकाचे १५ व्या वर्षात पदार्पण

0
IMG-20250617-WA0041
Spread the love


पुणे : ताशाची तर्री आणि ढोलांचा निनाद हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैभव आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तरुणाई एकत्र येत वाद्यवादनाचा सराव सुरू होतो. पुण्यातील नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक (ट्रस्ट) पुणे चा वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. मात्र, केवळ वाद्यपूजन व सरावाचा श्रीगणेशा न करता यावेळी सामाजिक उपक्रमांचा देखील श्रीगणेशा ‘नादब्रह्म’ च्या वादकांनी केला आहे.

नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक (ट्रस्ट) पुणेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात इंडियन ह्यूम पाईप कंपनीच्या मागे वाद्यपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी थायलंड फुकेत येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चे हुबेहूब मंदिर उभारणाऱ्या पापासॉर्न मिपा, आमदार हेमंत रासने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, माजी नगरसेवक हरिदास चरवड, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, पथकाचे कमलेश कामठे, आनंद खंडेलवाल आदींसह वादक उपस्थित होते.

भारतीय खोखो संघाचे स्वागत व सन्मान यावेळी करण्यात आला. त्यामध्ये प्राची वाईकर,कुणाल वाईकर, आदित्य गणपुले, सुयश गरगटे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच पथकातील सौरभ कापडे, ऋषभ म्हस्के, आदित्य बहिरट यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल त्यांना गौरविण्यात आले.

आमदार हेमंत रासने म्हणाले, तब्बल ३० ते ४० वर्षांपूर्वी वर्गणीकरिता कार्यकर्ता जायचा तेव्हा गणेशोत्सवाची चाहूल लागायची. आता, आपल्या पारंपरिक वाद्यांचे महत्व आपण ओळखले असून ते वाढविण्याकरिता अनेक पथके निर्माण झाली आहेत. या वाद्यांचा नाद ऐकू आला की गणेशोत्सवाची चाहूल लागते. देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. ती ओळख ढोल-ताशाच्या माध्यमातून देखील होऊ लागली असल्याची बाब आनंददायी आहे.

कमलेश कामठे म्हणाले, सन २०११ साली पथकाची स्थापना झाली. यावर्षी आपण १५ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. यंदा चार नवीन ताल ऐकायला मिळणार आहेत. सराव शुभारंभाच्या वेळी दोन संस्थाना मदत दिली आहे. त्यामध्ये संतुलन पाषाण निवासी शाळा, खराडी संस्थेला वह्या पुस्तके आणि सेवाधाम वृद्धाश्रम गोळेवाडी, डोणजे संस्थेतील अनाथ जोडप्यांचा वर्षांचा भोजनाचा खर्च ट्रस्टतर्फे केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • फोटो ओळ : नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक (ट्रस्ट) पुणेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात इंडियन ह्यूम पाईप कंपनीच्या मागे वाद्यपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक संस्थाना मदतीचा हात देण्यात आला. तसेच वाद्यपूजन करून सराव शुभारंभ देखील झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी