कृत्रिम बुद्धिमत्ता कलाक्षेत्रात उपयुक्तच : डॉ. अमेय पांगारकर
पुणे : कला क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उपयुक्त आहे, परंतु कलाकारांनी आपल्या कलेपासून दूर जाऊ नये, असे आवाहन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तज्ज्ञ, लेखक डॉ. अमेय पांगारकर यांनी केले.
संवाद, पुणे, हाऊस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ या उपक्रमाअंतर्गत ‘कला आणि करिअर’ या विषयावरील प्रदर्शनी आणि मार्गदर्शन सत्रांचे शिवाजीनगरमधील बालगंधर्व कला दालन येथे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवसाची (दि. 14) सुरुवात ‘कला करियर आणि एआय टूल्स’ या विषयावर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तज्ज्ञ, लेखक अमेय पांगारकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीतर्फे आयोजन करण्यात आले होते. पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक सुनील रेडेकर, पुणे विद्यार्थी गृह इंजिनिअरिंग महाविद्यालयातील एआय व डाटा सायन्स प्रमुख डॉ. मीनाक्षी अत्रे यांचा सहभाग होता.
प्रत्येक पिढीतील व्यक्तींना कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार करता आला पाहिजे, परंतु आपली विचार करण्याची क्षमता गमावता काम नये असे आग्रही मत नोंदवून डॉ. अमेय पांगारकर पुढे म्हणाले, आज समाजात गुगल आम्हाला आमच्यापेक्षा जास्त ओळखतो असा समज समजात रूढ होत आहे. माणसाने जणू विचार करण्याची क्षमताच आऊटसोर्स केली आहे, हे मात्र मानवासाठी घातक आहे. एआय हे टूल आहे, त्यावर न विसंबता त्याचा वापर माणसानेच करायचा आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. कला क्षेत्रात एआयद्वारे झालेली क्रांतीची माहिती डॉ. पांगारकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून दाखविली.
प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगविषयी माहिती देताना डॉ. मिनाक्षी अत्रे यांनी भाषा, संगीत, गणिती ज्ञान, नृत्य, व्यक्तीचे अंतरंग, बाह्यरंग, बोलीभाषा, ज्ञानाचे सबलीकरण याविषयी सविस्तर माहिती देऊन एआयचा दैनंदिन जीवनात वापर करताना लागणाऱ्या उपयुक्त ॲप्सविषयी उपस्थितांना अवगत केले.
पुणे विद्यार्थी गृहाच्या कार्याविषयी सुनील रेडेकर यांनी माहिती दिली.
फोटो ओळ : डॉ. अमेय पांगारकर यांचा सत्कार करताना प्रसाद मिरासदार. समवेत सुनील रेडेकर, सुनील महाजन.
-=-=-=-
‘कीर्तन : भारतीय पारंपरिक कला व व्यवसाय’
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आयोजित ‘कीर्तन : भारतीय पारंपरिक कला व व्यवसाय’ या विषयावरील चर्चासत्रात ह. भ. प. गणेश भगत महाराज, ह. भ. प. सचिन पवार महाराज, ह. भ. प. गोरक्ष उदागे महाराज, ह. भ. प. डॉ. दत्तात्रय फटांगडे महाराज यांचा सहभाग होता.
ह. भ. प. सचिन पवार महाराज म्हणाले, सांस्कृतिक क्षेत्रात वारकरी संप्रदाय-भागवत धर्माचे महत्त्व मोठे आहे. कीर्तन म्हणजे नृत्य, संगीत, सादरीकरणातून अभिव्यक्तीचे दर्शन घडविणे आहे. धार्मिक प्रबोधन करणे हे कीर्तनकाराचे कर्तव्य असून ते समाजाचे देणेच आहे. नव्या-जुन्याचा संगम साधत विद्यापीठ स्तरावर कीर्तनाच्या शिक्षणाविषयी कार्य होणे आवश्यक आहे. ज्या योगे संतांचे विचार या माध्यमातून जास्तीतजास्त प्रमाणात समाजापर्यंत पोहोचविले जाते. कीर्तनकाराला भाषा, काव्य, तात्विक अधिष्ठान, समाजातील चालू घडामोडी, सादरीकरण कौशल्य, उपासना आणि अभ्यास यांची जोड असावी लागते.
ह. भ. प. गोरक्ष उदागे महाराज म्हणाले, युवा पिढीने कीर्तनाकडे करिअर म्हणून जरूर पहावे. कीर्तन हे अंतरंग समृद्ध करणारे आहे. श्रवण, मननाकडे वळण्यासाठी कीर्तन हे उपयुक्त माध्यम आहे. गुरूंकडे जाऊन उपासना, भक्ती अभ्यास करताना कीर्तनाचा बाजार न करता साहित्य-संस्कृतीची जोपासना करत कीर्तन शिकणे योग्य आहे. माणसाचे बाह्यरंगच नव्हे तर अंतरंग समृद्ध करणारी कला म्हणजे कीर्तन होय.
ह. भ. प. डॉ. दत्तात्रय फटांगडे महराज म्हणाले, खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानकक्षेत आणण्याचे काम कीर्तनाद्वारे घडत आहे. कीर्तन हे समाज उद्धारण्याचे कार्य करत आहे. विद्वत्ता असेल तर कला जगवू शकते. फक्त ज्ञान प्रकट केल्यास कीर्तन रूक्ष होऊ शकते. परंतु त्यात भाव, भक्ती, भाषेचा उत्तम वापर झाल्यास कीर्तनाद्वारे परमात्म्याचे स्वरूप श्रोत्यांच्या हृदयात ठसते.
ह. भ. प. गणेश भगत महाराज म्हणाले, मेडिकल, इंजिनिअरिंगसारख्या मळलेल्या वाटा सोडून कीर्तन क्षेत्रात करिअर नक्कीच होऊ शकते. कीर्तन ही सामूहिक कला असून ती सादर करणाऱ्याला तसेच ऐकणाऱ्या आणि पहाणाऱ्यालाही आनंद देते. जीवनप्रवासात कला नेहमीच महत्त्वाची ठरते.
फोटो ओळ – कीर्तनकरांचा सत्कार करताना प्रसाद मिरासदार.
