February 15, 2026

विश्व हिंदू परिषदेतर्फे श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले सिंहगडावर पालखी सोहळा रविवारी (दि.१५)

0
IMG-20250613-WA0017
Spread the love



विश्व हिंदू परिषद पुणे व श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) तर्फे आयोजन : श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य अभिवादन सोहळा

पुणे : भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. त्यामुळे विश्व हिंदू परिषद, पुणे व श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन प्रत्येक गड किल्ल्यावर झाले पाहिजे. याउद््देशाने समितीने किल्ले सिंहगड येथे रविवार, दिनांक १५ जून रोजी सकाळी १० वाजता पालखी सोहळा आयोजित केला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी दिली.

अभिवादन सोहळ्याचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे. सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी ८ वाजता छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने होणार आहे. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण यांसह उपाध्यक्ष शरद जगताप, विभाग मंत्री केतन घोडके, धनंजय गायकवाड यांनी संयोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे. विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे रॅलीचा समारोप होईल. सोहळ्यामध्ये हजारो शिवभक्त सहभागी होणार आहेत.

उपाध्यक्ष शरद जगताप म्हणाले, रविवारी सकाळी १० वाजता सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखीत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमा ठेवण्यात येतात. पालखी मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, शंखनाद पथक आदी सहभागी होणार आहेत.

गडावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक होणार आहे. तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन देखील करण्यात येणार आहे. सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील यावेळी होणार आहे. कार्यक्रमाचा समारोप सिंहगड पायथ्याजवळ महाप्रसादाने होणार आहे. पर्यटकांनी रविवारी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत चारचाकी वाहने घेऊन येणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी