April 1, 2026

आधुनिक जंगल‌’मधून उलगडले मुलांचे भावविश्व : मृणालिनी कानिटकर-जोशी

0
IMG-20250611-WA0009
Spread the love


कविता वाचनातून मुलांवर होतात शब्दसंस्कार : मृणालिनी कानिटकर-जोशी
ज्योती उटगीकर-देशपांडे लिखित ‌‘आधुनिक जंगल‌’ बालकविता संग्रहाचे प्रकाशन

पुणे : सध्याच्या बालसाहित्यातून वास्तवता मांडली जात असली तरी त्यातून रम्यता, कल्पकता हरवत चालली असल्याचे दिसून येत आहे. मात्र ज्योती उटगीकर-देशपांडे लिखित ‌‘आधुनिक जंगल‌’ बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी केले.
उत्कर्ष प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‌‘आधुनिक जंगल‌’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी लोकमान्य नगरमधील रुईया मूकबधीर विद्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी जोशी बोलत होत्या. ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, स्नेह सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राधा संगमनेरकर, प्रकाशक सु. वा. जोशी, प्राचार्य श्याम भुर्के, एकपात्री कलाकार बंडा जोशी मंचावर होते.
कविता वाचनातून मुलांवर शब्दसंस्कार होतात, असे सांगून मृणालिनी कानिटकर-जोशी म्हणाल्या, बालवयात मुलांना चांगले, सकस साहित्य वाचायला मिळाल्यास मुलांची जडणघडण चांगल्या माणसात होईल.
अंजली कुलकर्णी म्हणाल्या, ‌‘आधुनिक जंगल‌’ या बालकविता संग्रहातून जुन्याचे आधुनिकतेशी संधान साधले गेले आहे. लहान मुलांसाठी साहित्यनिर्मिती करणे ही फार अवघड गोष्ट असते. मुलांच्या अंतरंगात शिरून व्यक्त व्हावे लागते, बालसुलभ कुतुहलता, जिज्ञासा असावी लागते. ज्योती उटगीकर-देशपांडे यांनी तन्मयतेतून लिखाण केले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काव्यामुळेच मिळाला असल्याचे सांगून श्याम भुर्के म्हणाले, ज्योती उटगीकर-देशपांडे यांच्या कविता अंतर्मुख करायला लावणाऱ्या आहेत. बंडा जोशी म्हणाले, मराठी वाचनासाठी मुलांना उद्युक्त केले पाहिजे त्याच प्रमाणे शाळा-शाळांमध्ये बालकवितांच्या वाचनाचे कार्यक्रम व्हावेत. सु. वा. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
पुस्तक लिखाणाविषयी ज्योती उटगीकर-देशपांडे यांनी भूमिका विशद केली. चित्रकार अशोक बोकील यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली अत्रे यांनी केले.

फोटो ओळ : ‌‘आधुनिक जंगल‌’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित अंजली अत्रे, डॉ. राधा संगमनेरकर, निलिमा जोशी-वाडेकर, ज्योती उटगीकर-देशपांडे, अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर-जोशी, श्याम भुर्के, सु. वा. जोशी, बंडा जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी