पुणेकरांनी साजरा केला वृक्षांचा वाढदिवसआधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; वृक्षांचा वाढदिवस साजरा करत ‘जागतिक पर्यावरण दिन’ अनोख्या पद्धतीने साजरा
पुणे : आकाशाची छाया देणाऱ्या, श्वासाला प्राणवायू देणाऱ्या आणि निसर्गाची नाळ जपणाऱ्या वृक्षांचे उपकार मानत, पुण्यात ‘वृक्षांचा वाढदिवस’ साजरा करण्यात आला. झाडांना फुलांनी सजवले गेले, औक्षण करून शुभेच्छा देण्यात आल्या आणि यानिमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘आधार सोशल फाउंडेशन’ आणि ‘उत्कर्ष महिला मंडळा’ तर्फे अनोख्या पद्धतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळाच्यावतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावर लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार हेमंत रासने, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ न. म. जोशी, आधार सोशल फाउंडेशनचे प्रमुख दिलीप काळोखे, सविता काळोखे, कसबा भाग संघ चालक ॲड प्रशांत यादव,अर्जुन पुरस्कार प्राप्त खो खो खेळाडू श्रीरंग इनामदार, शैलेश टिळक, कुणाल टिळक राजेंद्र काकडे, लायन क्लब चे मंद्रूपकर, अनिल बेलकर, पुरण हुडके,राजेश शिंदे, नंदकुमार जाधव,पीयूष शहा, विकास हांडे, सुनील रसाळ यावेळी उपस्थित होते.
यावेळी पर्यावरणपूरक कार्य करणाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. अलका नहार, मैथिली जोशी, निळश्री खाटपे, श्रुती सांगळे, शीतल शेळके, हर्षदा शहा,वृषाली क्षीरसागर, सोनाली पाटील, सविता ठाकर, सुनंदा शेवाळे, शर्वरी काळोखे, अनिल काळोखे, यशोधन आखाडे आदिंनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. यावेळी १ हजार तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
हेमंत रासने म्हणाले, आपण कितीही आधुनिक झालो, तरी पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमा, नारळी पौर्णिमा यांसारख्या सणांतून निसर्ग पूजनाची परंपरा आहे. जर प्रत्येकाने एक झाड लावले व त्याचे संगोपन केले, तर दीडशे कोटी वृक्ष निर्माण होऊ शकतात आणि पर्यावरणाचा समतोल साधता येईल, असेही त्यांनी सांगितले.
न. म. जोशी म्हणाले, धन्यता हा शब्द मी अनेकदा शिकवला, पण आज वृक्षांचा वाढदिवस साजरा करताना तो अनुभवला. वृक्ष हे माणसापेक्षा श्रेष्ठ आहेत, ते अन्न खातात आणि आपल्याला फळे, फुले व प्राणवायू देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे, प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दिलीप काळोखे म्हणाले, अनेकजण वृक्षारोपण करतात, परंतु नंतर त्या वृक्षांचे पुढे काय होते हे माहिती नसते. फक्त वृक्षारोपण करून चालत नाही, तर त्या वृक्षांचे संगोपनही गरजेचे आहे. आज आपण लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत आहोत. यानिमित्ताने प्लास्टिक व ई-कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येणार आहे,असेही त्यांनी सांगितले.
फोटो ओळ – आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळाच्यावतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावर लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर
