पुणे, १४ ऑक्टोबर २०२६ : डिजिटल पेमेंट अॅप निवडताना कॅशबॅक आणि आकर्षक रिवॉर्ड्स हे ग्राहकांसाठी महत्त्वाचे घटक ठरत आहेत. चांगले रिवॉर्ड्स मिळत असल्यास पुण्यातील ४६ टक्के ग्राहक पेमेंट अॅप बदलण्यास तयार असल्याचे ‘हाऊ अर्बन इंडिया पे रिपोर्ट २०२६’ मधून समोर आले आहे. पहले इंडिया फाउंडेशनने अॅमेझॉन पेसोबत केलेल्या या अभ्यासात देशातील २० राज्यांमधील १०० शहरांतील ५,१४९ ग्राहक आणि १,०५४ व्यापाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.
अहवालानुसार, भारतातील शहरी भागातील ७५ टक्के ग्राहक त्यांच्या प्राथमिक पेमेंट अॅपद्वारे किमान एका आर्थिक उत्पादनाचा वापर करतात. मात्र, डिजिटल कर्जाबाबत अजूनही विश्वासाची कमतरता आहे. डिजिटल क्रेडिटबाबत ८८ टक्के ग्राहकांना माहिती असली, तरी प्रत्यक्ष वापराचे प्रमाण ३१ टक्के आहे. फसवणुकीपासून संरक्षणाची हमी मिळाल्यास ५१.५ टक्के ग्राहक पेमेंट अॅपद्वारे कर्ज घेण्यास तयार असल्याचेही अहवालात नमूद केले आहे.
डिजिटल पेमेंटचा वापर आता दैनंदिन व्यवहारांचा भाग झाला आहे. ई-कॉमर्स व्यवहारांसाठी ७१ टक्के ग्राहक यूपीआयचा वापर करतात. बाहेर खाणे आणि प्रवासासाठी ५४ टक्के, तर इंधन, वाहतूक तसेच वैद्यकीय खर्चासाठी प्रत्येकी ५३ टक्के ग्राहक यूपीआयला पसंती देतात.
सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खर्चातही मोठी वाढ होते. सर्वेक्षणातील ७७ टक्के ग्राहक नेहमीपेक्षा किमान ५० टक्के अधिक खर्च करतात. खरेदीच्या प्रमाणात फॅशन आणि ब्युटी उत्पादने ८९ टक्क्यांसह आघाडीवर आहेत, तर एकूण खर्चाच्या मूल्यानुसार कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसचा वाटा सर्वाधिक आहे.
व्यापाऱ्यांमध्येही डिजिटल पेमेंटचा स्वीकार वाढत आहे. सर्वेक्षणातील ८०.६ टक्के व्यापारी डिजिटल पेमेंट स्वीकारतात, तर ७९.५ टक्के व्यापाऱ्यांनी कार्यक्षमता किंवा विक्रीत वाढ झाल्याचे सांगितले. मात्र, डिजिटल व्यवहारांच्या सेटलमेंटला होणारा विलंब ही व्यापाऱ्यांसाठी प्रमुख चिंता आहे.
अहवालानुसार, डिजिटल पेमेंट क्षेत्राच्या पुढील वाढीसाठी सुरक्षित व्यवहार, पारदर्शकता, ग्राहकांचा विश्वास आणि सुलभ डिजिटल कर्ज सुविधा महत्त्वाच्या ठरणार आहेत.