September 7, 2026

मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न जीवन गौरव पुरस्कार – २०२६

0
IMG-20260902-WA0074
Spread the love

आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व प्रशिक्षक प्रा. विलास कथुरे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

पुणे, दि. २ सप्टेंबर: कुस्ती खेळासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व प्रशिक्षक आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागातील असिस्टंट डायरेक्टर प्रा. विलास कथुरे यांना नुकताच मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न जीवन गौरव पुरस्कार – २०२६ ने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकी लिजेंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार समिती, दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड व कालीरमन फाउंडेशन इंडिया यांच्यातर्फे हा सन्मान हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल, कराड) येथे प्रदान करण्यात आला.

त्यांच्या या यशाबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक प्रा. विलास कथुरे यांनी कुस्ती खेळासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. ते भारतीय कुस्ती संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व जागतिक कुस्ती संघटनेचे निष्णात पंच आहेत. तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी सहसचिव व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. आशियाई कुस्ती स्पर्धा, राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा व जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक व जागतिक कुस्ती संघटनेचे निष्णात पंच म्हणून त्यांनी जवळपास २८ देशांमध्ये सहभाग घेतला आहे. ते गुरु द्रोणाचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष आहेत.

या कार्यक्रमाला हिंदकेसरी पै. संतोष आबा वेताळ, डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे, प्रा. संजय दुधाने, प्रा. नितीन शिंदे, प्रा. अमोल साठे, बाबा मते आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी