September 7, 2026

उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांना सांगितीक मानवंदना

0
IMG-20260816-WA0022
Spread the love

पुणे : बहारदार ढोलकी वादन, किराणा घराण्यातील बंदिशींचे सुमधुर गायन आणि तालबद्ध तबलावादनातून फरुखाबाद घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांना ३३व्या स्मृतिदिनानिमित्त सांगितीक मानवंदना देण्यात आली.
उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांचे नातू आणि प्रसिद्ध तबलावादक सलीम अख्तर तसेच खानसाहेब यांच्या शिष्य परिवारातर्फे भरत नाट्य मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित राजू जावळकर यांच्या ढोलकी वादनाने झाली. त्यांनी पारंपरिक कायदे, रेले सादर करून आपल्या बहारदार वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. उदय शहापूरकर यांनी नगमा साथ केली.
त्यानंतर किराणा घराण्याचे युवा आश्वासक गायक मोहसीन अली खान यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग पूरिया धनाश्रीमधील ‘बल बल जाऊ’ या बंदिशीने केली. त्यानंतर द्रुत तालात ‘मुश्किल करो आसान मोरी ख्वाजा’ ही पारंपरिक बंदिश ऐकविली. रूपक तालातील ‘मेहेर की नजर होवे मोपे’ ही रचना सुमधुरपणे सादर करून ‘प्रितम से एसी कौन भूल भयी’ ही रचना प्रभावीपणे सादर केली. गायनाची सांगता खमाजमधील ठुमरीने करताना ‘रंग रंगिली रसिली छबिली’ ही रचना ऐकवून रसिकांना आनंदित केले. सलीम अख्तर (तबला), उदय शहापूरकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाची सांगता पंडित नवीन शर्मा यांच्या एकल तबलावादनाने झाली. सुरुवातीस तीनताल सादर करून नंतर उस्ताद झाकिर हुसेन, उस्ताद वाजीद अली हुसेन खानसाहेब यांनी निर्मिलेले रेले, कायदे, चक्रदार आदींचे प्रभावी सादरीकरण केले. तबलावादनावरील प्रभुत्वाने रसिकांना वादनाची अनोखी मेजवानी लाभली. राजस खासगीवाले यांनी नगमा साथ केली.
सुरुवातीस फैय्याज हुसेन खानसाहेब, अन्वर कुरेशी, पंडित पांडुरंग मुखडे, अली हुसेन, प्रकाश केमकर, सलीम अख्तर, पंडित राजू जावळकर, भरत जंगम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन आणि उस्ताद गुलाम रसूल खान साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांच्या शिष्य परिवाराला आशीर्वाद देताना फैय्याज हुसेन खान साहेब म्हणाले, गुरूंची शिकवण शिष्यपरिवार अखंडितपणे श्रद्धा व निष्ठेने पुढे नेत प्रवाहित ठेवत आहेत याचे विशेष कौतुक वाटते.

कलाकारांचा सत्कार सलीम अख्तर, प्रकाश केमकर, भरत जंगम, विश्वास जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. गुरू-शिष्य परंपरेची महती सांगत सारा अली हुसेन यांनी निवेदनाद्वारे कार्यक्रमात रंग भरले.

फोटो : पंडित राजू जावळकर
फोटो : सलीम अख्तर आणि मोहसीन अली खान
फोटो : पंडित नवीन शर्मा

प्रति,
मा. संपादक
उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांच्या ३३व्या स्मृतिदिनानिमित्त शिष्य परिवारातर्फे त्यांना सांगितीक मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाच्या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
उस्ताद सलीम अख्तर, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी